Pune Corona Vaccine : पुण्याला थेट केंद्राकडून लस! दावा फोल ठरल्यानंतर पुण्याच्या महापौरांचं विभागीय आयुक्तांकडे बोट
पुण्याला राज्यातील इतर शहरांप्रमाणे राज्याच्या कोट्यातूनच लस मिळाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळं श्रेय घेण्याच्या नादात पुण्याच्या महापौरांनी केलेले दावे फोल ठरल्याचं उघड झालं आहे.
पुणे : कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यात देखील इतर शहरांप्रमाणे लसीचा तुटवडा जाणवतोय. असं असताना पुण्याला केंद्र सरकाकडून थेट दोन लाख 48 हजार डोस पाठवण्यात आल्याचा दावा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. प्रत्यक्षात मात्र पुण्याला देखील राज्यातील इतर शहरांप्रमाणे राज्याच्या कोट्यातूनच लस मिळाल्याचं उघड झालं आहे. दुसरं म्हणजे पुणे जिल्ह्याला शनिवारी फक्त एक लाख डोसचा पुरवठा झालाय त्यापैकी तीस हजार डोस पुणे शहराच्या वाट्याला आलेत. त्यामुळं श्रेय घेण्याच्या नादात पुण्याच्या महापौरांनी केलेले दावे फोल ठरल्याचं उघड झालं आहे. नंतर सारवासारव करताना महापौरांनी 'येत्या तीन दिवसांमध्ये पुण्याला साडे तीन लाख डोस मिळणार असल्याचं आपल्याला म्हणायचं होतं' असं म्हणत वेळ मारुन नेली आहे.
पुण्यातील बहुतेक लसीकरण केंद्र शनिवारी देखील बंदच राहिली. शुक्रवारी लस संपल्याने ठप्प झालेलं लसीकरण शनिवारी दुपारपर्यंत सुरु होऊ शकलं नाही. रात्रीत पाठवण्यात आलेले डोस लसीकरण केंद्रांवर पोहोचल्यावर दुपारनंतर संथ गतीनं या लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र मागणीच्या तुलनेत लसींची संख्या अतिशय कमी असल्यानं लसीचा हा साठा लगेच संपला.
पुणे जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांची देशातील विक्रमी संख्या नोंद होत असताना गेल्या दिवसांपासून इतर शहरांप्रमाणेच पुण्यातही लसीचा तुटवडा जाणवू लागला होता. काही दिवसांपूर्वीपर्यंत पुणे जिल्ह्यात दररोज 80 ते 85 हजार लोकांना लस दिली जात होती. मात्र लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने हे प्रमाण 50 ते 55 हजारांवर येऊन पोहचलं होतं. त्यामुळे पुण्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून थेट अडीच लाख लसीचे डोस मिळाल्याचा दावा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला होता. त्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची शिष्टाई कामाला आल्याचंही मोहोळ यांनी म्हटलं होतं.
प्रत्यक्षात मात्र पुण्याला देखील राज्यातील मुंबई , सातारा आणि सोलापूर या इतर शहरांप्रमाणेच शनिवारी रात्री केंद्राकडून लसीचा पुरवठा करण्यात आला.
कुठल्या जिल्ह्याला किती लसी
शनिवारी रात्री मुंबईला 99 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला .
सातारा जिल्ह्याला 35 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला .
सोलापूर जिल्ह्याला 17 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला .
तर पुणे जिल्ह्याला एक लाख लसींचा पुरवठा करण्यात आला.
पुण्याला मिळालेल्या एक लाख लसींच्या डोसपैकी पन्नास हजार हे ग्रामीण भागासाठी, तीस हजार हे पुणे शहरासाठी तर वीस हजार हे पिंपरी - चिंचवड शहरासाठी वापरण्यात आले.
महत्वाचे म्हणजे ही सगळी लस राज्याच्या आरोग्य विभागाच्या पुण्यातील औंध भागातील कोल्ड स्टोअरेज मधून वितरित करण्यात आली. त्यामुळे पुण्याला केंद्र सरकाकडून लसींचा थेट पुरवठा करण्यात आल्याचा महापौर मुरलीधर मोहोळ यांचा दावा फोल ठरला .
एकीकडे पुण्यात दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत असताना शनिवारी पुणे शहरात एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याचं प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या डॅश बोर्डवर सांगण्यात आलं तर शेजारच्या पिंपरी चिंचवड शहरात फक्त दहा व्हेंटिलेटर बेड शनिवारी उपलब्ध होते. ऑक्सिजन बेडची संख्याही वेगाने कमी होत असून अशीच परिस्थिती राहिली तर ते देखील संपतील अशी परिस्थिती आहे. अशावेळी कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं हा एकमेव पर्याय आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने लसीकरणाचा वेग उलटा झालाय. अशावेळी तो वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी श्रेयासाठी चढाओढ करण्याची ही वेळ नक्कीच नाही हे पुण्याच्या महापौरांनी समजून घेण्याची गरज आहे.
महापौरांचं पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे बोट
पुण्याला नक्की किती लस मिळाली आणि ती केंद्राकडून थेट मिळाली की राज्याच्या कोट्यातुन मिळाली याबाब पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वक्तव्यानंतर संभ्रम निर्माण झाला आहे. यावर स्पष्टीकरण देताना पुण्याच्या महापौरांनी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे बोट दाखवलंय. विभागीय आयुक्तांनी आपल्याला जी माहिती मिळाली तीच आपण पत्रकार परिषदेत सांगितल्याच महापौरांनी म्हटलंय. त्याचबरोबर पुण्याला साडे तीन लाख नाही तर शनिवारी रात्री एक लाख डोसच मिळाल्याच मान्य केलय. येत्या तीन दिवसांमध्ये पुण्याला साडे तीन लाख डोस मिळणार असल्याचं आपल्याला म्हणायचं होतं असं महापौर म्हणालेत. त्याचबरोबर पुण्याला झालेला लसीचा पुरवठा हा थेट केंद्राकडून नाही तर राज्याच्या कोट्यातूनच झाल्याचं त्यांनी मान्य केलंय.