Pune CM Eknath Shinde : आनंद दिघेंची परंपरा मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवली अन् एकनाथ शिंदे थेट भीमाशंकरच्या दर्शनाला गेले...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांची परंपरा कायम राखली आहे. पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर मंदिरात दर्शन घेतलं आहे. धर्मवीर आनंद दिघे दरवर्षी श्रावण महिन्यात भीमाशंकराचं दर्शन घेण्यासाठी येत होते.
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची परंपरा कायम राखली आहे. पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर मंदिरात दर्शन घेतलं आहे. आनंद दिघे दरवर्षी श्रावण महिन्यात भीमाशंकराचं दर्शन घेण्यासाठी येत होते. भीमाशंकर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी श्रावण महिन्यात भीमाशंकराचं दर्शन घेण्यासाठी येत होते. एकनाथ शिंदेंनी ती परंपरा आजही ही कायम ठेवल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनीही भीमाशंकराचं दर्शन घेतलं. आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्यानं भीमाशंकर मंदिर प्रशासनाकडून आकर्षक सजावट करण्यात आली होती. शेवटचा सोमवार असल्यानं भाविकांचीही मंदिरात मोठी गर्दी झाली होती. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचाही समावेश होता.
'पाऊस पडू दे, संकट दूर होऊदे '
बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊदे, राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराकडे केल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले, भाविक श्रद्धेने आणि भक्तीभावाने येथे दर्शनाला येत असतात. मी दरवर्षाप्रमाणे यावर्षीही श्रावणी सोमवारी दर्शनासाठी आलो आहे. येथे लाखो भक्त येत असल्याने शासनाने 148 कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत त्यातील 68 कोटी विविध सुविधांवर खर्च करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, अशा सर्व मूलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिल्या जातील. परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि स्नानगृहाची व्यवस्था करण्याचे तसेच परिसरातील आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
विविध नेत्यांनीही घेतलं दर्शन
महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंनीही भीमाशंकराचं सपत्निक दर्शन घेतलं. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नेते सचिन अहिर आणि उपनेत्या सुषमा अंधारेंनी भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली. राज्याला दुष्काळी परिस्थितीतून मुक्त करावं, राजकारणाचं वातावरण दूषित करणाऱ्या नेत्यांना सद्बुद्धी द्यावी आणि सत्ताधाऱ्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्याची जाण द्यावी, असं वेगवेगळं मागणं सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भीमाशंकराकडे मागितलं.
इतर महत्वाची बातमी-