Pune Chandani Chowk : नितिन गडकरींची एक घोषणा अन् चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं काम 90 टक्के पूर्ण; 1 मे रोजी होणार उद्घाटन
पुण्यातील बहूप्रतिक्षित चांदणी चौकातील प्रकल्पाच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. या प्रकल्पाचं 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. या पुलाची पाहणी करुन 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी उद्घाटन होणार असल्याची घोषणा मंत्री नितिन गडकरी यांनी केली होती.
Pune Chandani Chowk : पुण्यातील बहुप्रतिक्षित चांदणी चौकातील (Chandani Chowk) प्रकल्पाच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. या प्रकल्पाचं 90 टक्के काम पूर्ण झालं आहे. या पुलाची पाहणी करुन 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी उद्घाटन होणार असल्याची घोषणा मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली होती. त्यानंतर चांदणी चौकातील प्रकल्पाच्या कामाला वेग आला होता. पुणेकर मागील अनेक महिन्यांपासून हा उड्डाणपूलाच्या लोकार्पणाची वाट बघत होते. अखेर 1 मे रोजी या उड्डाणपूलाचं उद्घाटन होणार आहे.
उद्घाटनाच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर काम वेगाने करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या कामाला वेग आला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी या संपूर्ण कामाची पाहणीदेखील केली होती. या उड्डाणपुलाचं गर्डर टाकण्याचं काम 15 ते 20 एप्रिल दरम्यान करण्याचं नियोजन केलं आहे. हे काम सुरु होण्यापूर्वी या मर्गावरील वाहतूक वळवण्यात येणार आहे. त्यासोबतच मुळशीच्या दिशेने जाणाऱ्या भुयारी मार्गाचं कामदेखील सुसाट सुरु आहे.
वाहतुकीत बदल...
एनडीए चौक परिसरातील नवा उड्डाणपूल आणि तेथील रस्त्यांचा 'एनएचएआय'कडून आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार या चौकातील उड्डाणपूल आणि रस्त्यांची 90 टक्के कामं पूर्ण झाली आहेत. नव्या उड्डाणपुलासाठी आवश्यक खांब उभारणीचे काम पूर्ण झालं आहे. 15 ते 20 एप्रिलदरम्यान गर्डर टाकण्याचे काम होणार आहे. त्यासाठी वाहतूक दोन दिवस पर्यायी मार्गाने वळविण्याचे नियोजन 'एनएचएआय'कडून करण्यात येत आहे. बावधन ते सातारा आणि वेदभवन ते मुळशी या सेवा रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून 10 एप्रिलपासून हे रस्ते वाहनचालकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे 'एनएचएआय'कडून सांगण्यात आले.
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटणार
मागील काही महिन्यांपासून चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलाचं काम सुरु असल्याने वाहतुकीसाठी मोठी समस्या निर्माण होत होती. चांदणी चौकातील हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडी फुटणार असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या पूलाचं लोकार्पण झाल्यानंतर खरंच वाहतुकीत काही फरक जाणवेल का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता
1 मे रोजी या पुलाचं लोकार्पण होणार असल्याची घोषणा मंत्री नितिन गडकरी यांनी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊ आणि त्यानुसार उद्घाटन करु असं नितिन गडकरी म्हणाले होते. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता शक्यता आहे.