अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये दारू दुकानांवर प्राध्यापकांना ड्युटी, विरोधानंतर तहसीलदारांचा आदेश मागे
गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या प्राध्यापकांवर देण्यात आली. एबीपी माझानं यावर लक्ष वेधल्यानंतर मुर्तिजापूरच्या तहसीलदारांनी आपले आदेश मागे घेतले आहेत.
अकोला : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरमध्ये दारूच्या दुकानावर चक्क प्राध्यापकांची ड्युटी लावण्याचा प्रकार समोर आला आहे. मुर्तिजापूरचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी हे अजब आदेश काढले होते. मुर्तिजापूर शहरातील संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या 9 प्राध्यापकांची दारू दुकानांवर ड्युटी लावण्यात आली. गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या प्राध्यापकांवर देण्यात आली. एबीपी माझानं यावर लक्ष वेधल्यानंतर मुर्तिजापूरच्या तहसीलदारांनी आपले आदेश मागे घेतले आहेत.
मुर्तिजापूर तालुका ही संत गाडगेबाबांची कर्मभूमी समजली जाते. संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर व्यसनमुक्तीचा ध्यास घेऊन प्रचार आणि प्रसाराचे काम केले. मात्र त्यांच्याच कर्मभूमीत त्यांचंच नाव असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांसमोर एक नवाच पेच निर्माण झाला होता. पेच होता दारूच्या दुकानावर लागलेल्या ड्युटीचा. मुर्तिजापूर येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या नऊ प्राध्यापकांची ड्यूटी चक्क दारुच्या दुकानावर लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील नऊ दारु दुकानांवर या प्राध्यापकांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दारु दुकानांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ आणि इतर अटी, शर्तींचं पालन होत आहे की नाही, हे पाहण्याचं काम सोपवण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र शासनाने राज्यभरात देशी व विदेशी दारू विक्रीचे नियम ठरवून दिले आहेत. तब्बल महिनाभरानंतर दारूचे दुकान एवढी झाल्यामुळे दारुड्याची प्रचंड गर्दी या दुकानांवर उसळली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना यांचा बोजवारा उडण्याची भीती निर्माण झाली आहे. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि तेथे दारू विक्रीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची खातरजमा करण्यासाठी मुर्तिजापूर तालुक्यातील दारु दुकानांवर चक्क प्राध्यापकांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे सर्वच्या सर्व प्राध्यापक संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे आहेत. विशेष म्हणजे अनेक महाविद्यालयीन युवक या दारूविक्रीच्या रांगेत प्राध्यापकांना आढळून येतात. मात्र ड्युटी म्हणून या शिक्षकांना त्याच विद्यार्थ्यांना फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम सांगत दारू विकत घेण्याची परवानगी द्यावी लागत आहे.निर्णयामुळे प्राध्यापक आणि संघटना संतप्त
मुर्तिजापूर तहसिलदारांच्या या आदेशामूळे मुर्तिजापूरातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. या आदेशाचा सर्व प्राध्यापक आणि शिक्षकांनी विरोध केला. ज्ञानदानाचं पवित्र काम करणाऱ्या प्राध्यापकानं दारूच्या दुकानावर सेवा बजावण्याच्या आदेशाचा प्राध्यापकांच्या संघटनेनंही विरोध केला. यामुळे प्रशासकीय पातळीवरही मोठी खळबळ माजली होती.
अखेर आदेश मागे घेत तहसीलदारांकडून दिलगिरी व्यक्त
या प्रकारानंतर 'एबीपी माझा'नं ही बातमी लावून धरली. 'एबीपी माझा'शी बोलताना तहसीलदार प्रदीप पवार यांनी हा आदेश रद्द करत असल्याचं स्पष्ट केलं. या आदेशानं प्राध्यापक दुखावल्याने तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली. सदर शिक्षकांना जाणीवपूर्वक दारूच्या दुकानावर ड्युटी देण्यात आलेली नाही. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळानुसार आम्ही शिक्षकांना रेशन दुकान वर इतर कर्मचाऱ्यांना चेक पोस्टवर तर काही कर्मचाऱ्यांना इतर जबाबदारी दिली आहे. उर्वरित जे मनुष्यबळ उपलब्ध होते ते दारूच्या दुकानावर लावण्यात आले आहे. त्यामध्ये प्राध्यापक आले आहेत. मात्र हे जाणीवपूर्वक घडलेले नाही, असं तहसीलदार प्रदीप पवार यांनी सांगितलं.