राज्यातील दोन शिक्षकांचा राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान; नारायण चंद्रकांत मंगलाराम आणि संगीता सोमाणी यांचा गौरव
अहमदनगरमधील जिल्हा परिषदेचे शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलाराम यांचा आणि मुंबईतील संगीता सोमाणी यांना आज आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वेदांत नेब/निखिल चौकर : केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. आज शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आभासी कार्यक्रमद्वारे देशातील 47 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्यातील दोन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार आज प्रदान करण्यात आला आहे. यावर्षी देशभरात कोरोनाच संकट असल्यामुळे हा पुरस्कार सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडला.
सलग तिसदा अहमदनगर जिल्ह्याला हा पुरस्कार मिळाला आहे. राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी-चेडगाव येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलाराम यांना जाहीर झाला आहे. आज राष्ट्रपतींकडून दिले जाणारे सन्मानपत्र आणि मेडल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंगलारम यांना प्रदान केले. गोपाळवाडी या शाळेत बहुतांश मुले हे भटक्या जमातीचे आहेत. त्यांना शिक्षणात गोडी निर्माण करून वेगवेगळे उपक्रम मंगलाराम यांनी राबविले आहेत. नवी दिल्लीच्या ncert च्या पथकाने या शाळेवर येऊन यापूर्वी मंगलाराम यांच्या उपक्रमाची दखल घेतली. आर्ट इंटेग्रॅटेड लर्निंग या उपक्रमांतर्गत कलेच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नाट्यकीकरण, बाहुली नाट्य यासारखे प्रयोग केले. मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह टीचर्सच्या माध्यमातून जगातील 25 देशातील शिक्षकांशी संपर्कातून जगाची व्हर्चुअल सहल विद्यार्थ्यांना घडवण्यात आली. याच बरोबर कल्चर बॉक्सची देवाण घेवाण करण्यात आली. या अध्यापनातून विद्याथी ग्लोबल बनण्यास मदत झाल्याचे मंगलाराम यांनी सांगितले. त्यामुळे हा पुरस्कार आपल्याला मिळाला असून केलेल्या कामाची पावती मिळाल्याचे मंगलाराम यांनी सांगितले.
तर मुंबईतील चेंबूरच्या आटोमिक रिसर्च सेंटर स्कूलच्या संगीता सोमाणी यांना आज आदर्श शिक्षक पुरस्कर प्रदान करण्यात आला. संगीता सोमाणी या मागील 35 वर्षापासून शिक्षिकेचे काम करत असताना नवीन प्रयोगातून शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. सोमाणी यांनी खेळणीद्वारे रसायनशास्त्र शिकवता विद्यार्थ्यांना शिकवण्याचे नवे प्रयोग केले शिवाय गरीब विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. मनापासून, जीव लावून प्रत्येक शिक्षकाने आपलं विद्यार्थ्यांना शिकवण्याचा काम केलं पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितले.