(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डॉ.बाबासाहेबांच्या आंबडवे गावात पहिल्यांदाच येणार राष्ट्रपती, पंतप्रधानांचाही गावकऱ्यांशी लाईव्ह संवाद
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या मूळ गावाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनादिवशी भेट देणार आहेत.
रत्नागिरी : भारताच्या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे (Ambadave Village) या मूळ गावाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद भेट देणार आहेत. 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनादिवशी ही स्मारक भेट होणार असल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे आंबडवे आणि पंचतीर्थ घोषित अन्य ठिकाणच्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या दृष्टीने प्रशासनाकडून जोरदार चाचपणी व तयारी असल्याचे तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आंबडवे या गावी प्रथमच राष्ट्रपती येणार आहेत. राष्ट्रपतींचा तीन दिवसीय महाराष्ट्र दौरा नियोजित असून यात किल्ले रायगड भेटीचाही समावेश आहे.नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी डॉ.आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या स्थळांना पंच तीर्थ म्हणून घोषित केले. यामध्ये त्यांचे मूळ गाव आंबडवे, जन्मस्थळ महू, मुंबईतील इंदू मिल, लंडन येथील निवासस्थान आणि दिल्लीतील 26 अलिपूर रोड यांचा समावेश आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव असलेलं आंबडवे गाव विकासापासून दूरच आहे. स्थानिक नेत्यांपासून राज्य, देशपातळीवरील मंत्री, नेते, अधिकाऱ्यांनी भेटी देत आदर्श संसद ग्राम, पंचतीर्थ, शिल्पसृष्टी, पर्यटन भवन, डिजिटल गाव, राष्ट्रीय महामार्ग अशा कोटींच्या विकास कामांची आश्वासने दिली; मात्र ही आश्वासने हवेतच विरली आहेत.
आदर्श संसद ग्राम योजनेअंतर्गत आंबडवे हे गाव दत्तक घेण्यात आले होते. मात्र त्यातून या परिसराचा किती विकास झाला हा शोधाचा विषय ठरला आहे. अत्यंत गाजावाजा करून पंचतीर्थ घोषित झालेले आंबडवे आजही सोयीसुविधा, विकासापासून कोसो दूर आहेत. ही एक प्रकारे सविधानकारांचीही उपेक्षाच केल्याच्या भावना येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला रायगडाला भेट देणार
राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला रायगडाला भेट देणार आहेत. खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद संभाजीराजेंच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत 7 डिसेंबर रोजी रायगडाला भेट देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं आहे. राष्ट्रपतींच्या खासदार संभाजीराजेंनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. संभाजीराजे ट्वीटमध्ये म्हणाले की, राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे, असं संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.