Dilip Walse Patil : सायबर क्राईमसंदर्भात सरकार मोठं पाऊल उचलणार! नियामक यंत्रणा तयार करणार असल्याचं गृहमंत्र्यांचं सुतोवाच
Dilip Walse Patil LIVE : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एबीपी माझाच्या 'प्रश्न महाराष्ट्राचे' या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्याशी कायदा सुव्यवस्था विषयावर संवाद केला.
Dilip Walse Patil LIVE : आज सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे. गुन्ह्याचे प्रकार बदलत आहेत. सायबर क्राईमचं मोठं आव्हान आहे, या सायबर क्राईमवर अंकुश आणण्यासाठी एक आराखडा तयार करु आणि एक नियामक यंत्रणा तयार केली जाईल, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या 'प्रश्न महाराष्ट्राचे' या कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील सहभाग घेतला. यावेळी त्यांच्याशी कायदा सुव्यवस्था विषयावर संवाद केला.
दिलीप वळसे पाटील यांनी या कार्यक्रमात पोलिस भरती, भरती घोटाळा, पोलिसांची घरं, पोलिसांवरील आरोप, सायबर क्राईम, महिलांची सुरक्षा अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी आपली भूमिका मांडली.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यात सायबर क्राईमचे गुन्हे वाढत आहेत. टेक्नॉलॉजी वापरुन ब्लॅकमेलिंग केली जाते. यासंदर्भात मी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. त्यांना सूचना दिल्या की सायबर क्राईमवर लक्ष द्यावं लागेल. प्रत्येक जिल्ह्यात सायबरचं एक पोलिस स्टेशन आहे. मुंबईत चार सायबर पोलिस ठाणे आहेत. सायबर क्राईम संदर्भात केंद्र सरकार आणि गूगलला देखील लिहिलं आहे. काही अॅप धोकादायक आहेत. अॅपवरील कर्ज उपलब्ध होऊ लागल्यानं विद्यार्थीही बळी पडत आहेत. मी वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक या सायबर क्राईम संदर्भात बोलावली आहे. हा केवळ देशाचा नाही तर आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे. काही दिवसात यासाठी एक आराखडा तयार करु. सायबर क्राईमसंदर्भात रेग्युलेटरी यंत्रणा तयार करता येते का याची पडताळणी सुरु आहे, असं वळसे पाटील म्हणाले.
आरोप करायलाही जागा असणार नाही अशी पोलिसांची प्रतिमा बनवू
अलीकडच्या काळात काही घटनांमध्ये पोलिसांवर आरोप झाले आहेत. यामुळं पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला आहे यावर विचारलं असता वळसे पाटील म्हणाले की, पोलिसांमध्ये अंतर्गत सख्य असलंच पाहिजे. पोलिसांनी कर्तव्याप्रमाणं काम केलं पाहिजे. पोलिसांना माझं हे सांगणं आहे की, आपली ख्याती मोठी आहे. यात आपल्याला भर घालायची आहे. आरोप प्रत्यारोप झाले असले तरी आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. आरोप करायलाही जागा असणार नाही अशी प्रतिमा बनवू. यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे, असंही वळसे पाटील म्हणाले.
बदल्या पारदर्शक करण्याचा निर्णय, कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय बदली करणार नाही : दिलीप वळसे पाटील
बदल्यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी म्हटलं की, बदल्या पारदर्शक करण्याचा निर्णय, कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय बदली करणार नाही. प्रशासनिक दृष्ट्या महत्वाचं असल्यास काही बदल्या कराव्या लागतात. सर्व बदल्यांच्या ठिकाणी एक कमिटी केलेली आहे. त्या माध्यमातूनच बदल्या केल्या जातात. बदल्या नियमातच केल्या जातील, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
आज दिवसभर एबीपी माझावर महाचर्चा; दिग्गज नेते, मंत्र्यांना जनतेचे सवाल
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या गेल्या, सोबतच विकासकामांचे दावे देखील केले गेले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना सारख्या महाभयंकर लाटेचा सामना करावा लागला. सरकारसमोर अनेक अडचणी आल्या. केंद्राकडून राज्यावर अन्याय होत असल्याच्या भावना राज्य सरकारमधील बड्या नेत्यांनी वारंवार व्यक्त केल्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षानं एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. अशात सामान्य माणसांचे प्रश्न कुठंतही मागे राहिल्याचं चित्र आहे. महागाई, रोजगार, शेतीसमोरील आव्हानं, उद्योगातील समस्या असे अनेक सवाल सामान्य माणसांसमोर उभे ठाकले आहेत. याच निमित्तानं आज एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा कार्यक्रम होणार आहे. यात मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागातून सामान्य नागरिकांचे सवाल उत्तरदायी असलेल्या नेत्यांना मंत्र्यांना विचारले जाणार आहेत.