Prasad Lad : मालेगावचा बहुचर्चित स्टॅम्प वेंडर घोटाळा अधिवेशनात गाजला; प्रसाद लाड यांचे गंभीर आरोप, 'त्या' वेंडरवर कारवाईची मागणी
Stamp Vendor Scam : मालेगावच्या बहुचर्चित स्टॅम्प वेंडरचा घोटाळा पावसाळी अधिवेशनात चांगलाच गाजला आहे. प्रसाद लाड यांनी मालेगावच्या स्टॅम्प वेंडरवर गंभीर आरोप केले आहेत.
नाशिक : मालेगावच्या बहुचर्चित स्टॅम्प वेंडरचा घोटाळा (Stamp Vendor Scam) पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) चांगलाच गाजला आहे. स्टॅम्प वेंडर शेख साजिद शेख खलील याने शासनाचा महसूल बुडवला असून शासनाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केला आहे. या घोटाळ्याची शासनाने चौकशी करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.
मालेगाव (Malegaon) येथील बहुचर्चित स्टॅम्प वेंडर शेख साजिद शेख खलील क्रमांक 37/2001 याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडवून शासनाची दिशाभूल केली आहे. त्यांच्या या घोटाळ्याची व संपूर्ण मालमत्तेची शासनाने चौकशी करावी. यासंदर्भात विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहात भूमिका मांडली. याबाबत नाशिक जिल्हाधिकारी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून शासनात अहवाल सादर करणार असल्याचे समजते.
प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप
विधान परिषदेत प्रसाद लाड म्हणाले की, स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्टॅम्प वेंडरच्या माध्यमातून घोटाळे सुरु आहेत. मालेगाव येथील तहसील कंपाऊंडमधील शेख साजिद शेख खलील नावाच्या मुद्रांक शुल्क विक्रेत्यावर सातत्याने तक्रारी येत आहेत. मुद्रांक विक्रीमध्ये परवान्याचे नुतनीकरण करू नये म्हणून त्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यांनतर विना परवाना स्टॅम्प पेपर विकण्याचे काम सुरु आहे. सुमारे 67 लाख 72 हजार रुपये त्याने सरकारच्या खात्यात जमा करणे अपेक्षित होते. मात्र, ते आतापर्यंत संबंधित स्टॅम्प वेंडर सरकारच्या खात्यात जमा केलेले नाही. त्यापैकी केवळ चार लाख रुपये त्यांनी जमा केले आहे.
शासनाने चौकशी करावी
आम्ही स्वतः तक्रार दिलेली असताना त्यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यांच्यावरील दंड 50 लाखांवर आहे. 23 जुलै रोजी त्याची सुनावणी होणार आहे. मात्र आरोप आढळून देखील त्याच्यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. या प्रकारच्या वेंडर काम करताय आणि त्यांना अधिकारी जर पाठीशी घालत असतील, सरकारचा महसूल बुडत असेल तर अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच सरकारने अशा प्रकारचा महसूल बुडू देता कामा नये. हा महसूल मिळाला तर विविध योजनांमध्ये त्याचा फायदा होईल, असेही प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. आता या प्रकरणाची नाशिक जिल्हाधिकारी चौकशी करून शासनात अहवाल सादर करणार असल्याचे समजते.
आणखी वाचा
'मालेगाव गोळीबार प्रकरणात आसिफ शेख मास्टर माईंड', आमदार मौलाना मुफ्तींचा विधानसभेत सनसनाटी आरोप!