Maha Vikas Aghadi : 'पोट्टेहो' फेम कराळे गुरुजी 'मविआ'कडून लोकसभेच्या रिंगणात? हातकणंगलेमधूनही सोशल स्टार इच्छूक!
एका बाजूने राजकीय पक्षांमधून उमेदवारीसाठी प्रचंड स्पर्धा सुरू असतानाच आता आपण सोशल मीडिया स्टार तसेच सामाजिक क्षेत्रातील चेहरे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये इच्छूक असल्याचे समोर येत आहे.
मुंबई : आगामी लोकसभेसाठी (Loksabha Election 2024) बिगुल उद्याच (16 मार्च) वाजला जाणार आहे. निवडणूक आयोगाकडून उद्या दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुकीसाठी घोषणा केली जाणार आहे. राज्यामध्ये अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवारीवरून काथ्याकूट सुरु असला, तरी इच्छुकांची मात्र घालमेल वाढत चालली आहे. एका बाजूने राजकीय पक्षांमधून उमेदवारीसाठी प्रचंड स्पर्धा सुरू असतानाच आता आपण सोशल मीडिया स्टार तसेच सामाजिक क्षेत्रातील चेहरे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये इच्छूक असल्याचे समोर येत आहे. सोशल मीडियामध्ये प्रचंड प्रसिद्ध असलेले पोट्टेहो फेम नितेश कराळे गुरुजी महाविकास आघाडीकडून वर्धा लोकसभेतून इच्छुक आहेत.
नितेश कराळे वर्धा लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक
कराळे गुरुजी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. ते स्वतः वर्धा लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर सांगितले की, मी मागील तीन निवडणुकींबाबत शरद पवारांशी चर्चा केली. पक्षश्रेष्ठी काय करायचं आहे ते ठरवतील. मी माझी भांडली असून शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन मी पुढे जात असल्याचे नितेश कराळे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, या अगोदर मी विधान परिषदेची निवडणूक लढवली आहे. वर्ध्यातील स्थानिक राजकारणावर बोलताना त्यांनी सांगितले की, वर्धामधून गेल्या दहा वर्षापासून भाजपचे खासदार रामदास तडस असून त्यांनी जसं हवं तसं काम केलेलं नाही. शेतकऱ्यांच्या मालाचा विषय आहे, भाव वाढीचा विषय आहे, निर्यात बंदी केल्याने अवघड झालं आहे. शेतकऱ्यांची बाजू केंद्रात मांडली गेली नाही असं ते म्हणाले.
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरती ते म्हणाले की त्यांची भेट झाली नाही. मातोश्रीवर मी त्यांची भेट घेण्यासाठी थांबलो होतो. मात्र, भेट होऊ शकली नाही. मात्र पवार साहेबांची भेट झाली. मी वेळेवर पोहोचलो. साहेब माझी वाट पाहत बसले होते. अर्ध्या महाराष्ट्राला पवार साहेब भेटतात हे खरं असल्याचे नितेश कराळे म्हणाले.
डीपी अर्थात धनंजय पवारही हातकणंगले लोकसभेला इच्छूक?
दुसरीकडे, नितेश कराळे हे वर्धा लोकसभेतून इच्छुक असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा आता आणखी एका नावाची भर पडली आहे. सोशल मीडियामध्ये डीपी नावाने प्रसिद्ध असलेल्या धनंजय पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. धनंजय पवार हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये हातकणंगले जागा ठाकरे गटाकडे असल्याने महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये या संदर्भाने चर्चा केली जाईल असे आश्वासन धनंजय पवार यांना शरद पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या