(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Rathod : तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांना पोलिसांची क्लीन चिट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
नव्या मंत्रिमंडळात संजय राठोड यांचा समावेश होणार का या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.
मुंबई : राज्यभर गाजलेल्या एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात माजी वनमंत्री आणि आमदार संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात संजय राठोड यांचा समावेश होणार का असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आता संजय राठोड यांचा नव्या सरकारच्या मंत्रिमंडळता समावेश होणार असल्याचे संकेत मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांची माहिती दिली. राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार हा आषाढी एकादशीनंतर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. याच दरम्यान पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप केला जातोय त्या संजय राठोड यांचा समावेश होणार का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत. एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणानंतर त्यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
काय आहे आत्महत्या प्रकरण?
मूळची बीडमधल्या परळीची असलेल्या एका 22 वर्षाच्या मुलीचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय होता. इंग्लिश स्पीकिंगच्या क्लाससाठी ती पुण्यात आली होती. तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तिच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने तक्रार दाखल केली होती. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. त्यातच ती तरुणी आणि कथित मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिप समोर आल्या. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.