Sanjay Raut : राजकारण हे चंचल, कोणालाही मुठीत ठेवायला जमलं नाही; संजय राऊत यांचा पंतप्रधानांना टोला
इंदिरा गांधीनाही राजकारण आपल्या मुठीत ठेवता आलं नाही असं सांगत संजय राऊत म्हणाले की, देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोदींना एक ठाम पर्याय दिला तरच 2024 साली तुल्यबळ लढाई होईल.
नाशिक : राजकारण हे चंचल असतं, ते कोणालाही ते मुठीत ठेवणं जमलं नाही. ते आतापर्यंत नेहरुंना ताब्यात ठेवता आलं नाही, इंदिरा गांधींनाही ते आपल्या मुठीत ठेवता आलं नाही. त्यानंतरच्या वाजपेयींनाही हे शक्य झालं नाही. त्यामुळे कोणी कायम राजकारणात सत्तेत राहिल असं नाही असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजपला लगावला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, "पश्चिम बंगालचा पराभव हा भाजपचा नसून मोदींचा आणि अमित शाहंचा आहे असं अनेकजण म्हणतात. भाजपने आतापर्यंतच्या निवडणुका या मोदींच्या चेहऱ्यावर लढवल्या. आता देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोदींना एक ठाम पर्याय दिला तरच 2024 साली तुल्यबळ लढाई होईल."
वाघाच्या मिशिली हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहतोय
वाघाच्या मिशिली हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहतोय असा टोला खासदार संजय राऊतांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना उद्देशून काढला. संजय राऊतांची मिशी झडेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्याचा संदर्भ घेऊन विचारलेल्या प्रश्नाला संजय राऊतांना हे उत्तर दिलं आहे.
या राज्याचे मुख्यमंत्रीपद पाच वर्षे शिवसेनेकडेच राहणार, त्यामध्ये कोणताही वाटा नाही असं खासदार संजय राऊत म्हणाले. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "प्रत्येकाला आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. नाना पटोले हे मुख्यमंत्री व्हावेत ही त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याचा अर्थ काँग्रेस महाआघाडी सरकारमध्ये नाराज आहे असा होत नाही."
शिवसेना हा स्वाभिमान जपणारा पक्ष आहे, आता मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याने प्रत्येकाला स्वाभिमान आहे. हे वातावरण गेल्या वेळच्या सरकारमध्ये होतं का याबद्दल शंका आहे असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सूचनेनंतर आपण नाशिकच्या दौऱ्यावर असल्याचं संजय राऊत म्हणाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली.
महत्वाच्या बातम्या :