(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Petrol-Diesel Price : देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ सुरुच, डिझेलचा प्रवास शंभरीकडे
Petrol-Diesel Price : देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सहा राज्यांमध्ये पेट्रोलचे भाव हे 100 रुपयांवर पोहोचले आहेत.
नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज पेट्रोलचा दर 27 पैशांनी तर डिझेलचा दर हा 23 पैशांनी वाढला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 102.30 रुपये असून डिझेलची किंमत ही 94.39 रुपये इतकी आहे. देशातील एकूण सहा राज्यांत पेट्रोलचे दर हे शंभरीपार झाले असून डिझेलचा प्रवासही शंभरीकडे सुरु आहे.
राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ही 96.12 रुपये आहे तर डिझेलची किंमत ही 86.98 रुपये इतकी आहे. शहरांचा विचार करता भोपाळमध्ये सर्वाधिक म्हणजे 104.29 रुपये पेट्रोलचा दर तर 95.60 रुपये इतका डिझेलचा दर आहे.
राजस्थानमध्ये डिझेलही शंभरी पार
राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यामध्ये देशातील सर्वाधिक दराने पेट्रोल आणि डिझेलची विक्री होत आहे. त्या ठिकाणी पेट्रोल हे 107 रुपये तर डिझेल हे 100.05 रुपये इतके आहे.
देशातील महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि लड्डाख या सहा ठिकाणी पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि देशातील पेट्रोलच्या किंमतीत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली. गेल्या महिन्याच्या 4 तारखेपासून आतापर्यंत 22 व्या वेळी पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. ही वाढ 5.15 रुपये इतकी आहे.
महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतीत घट होत असताना भारतात मात्र इंधनाच्या दरात वाढ होत आहे.
देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
महत्वाच्या बातम्या :