शिवसेना खासदार संजय जाधव यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ का आली?
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने या तिन्ही पक्षांची ताकत वाढली असली तरी नेत्यांमधील धुसफूस आणि विरोध आजही कायम असल्याचे खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर स्पष्ट झालंय.
परभणी : राज्यातील महाविकास आघाडीत सर्व काही व्यवस्थित सुरू असल्याचे जरी वरिष्ठ नेते सांगत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र चित्र वेगळं आहे. परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा पाठवल्यानं हे उघड झालंय. परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथे खासदार आणि आमदार हा शिवसेनेचा असतो, मात्र स्थानिक स्वराज्य संस्था ह्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे असतात हे आजपर्यंतचे सूत्रच आहे. त्यामुळे इथे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे प्राबल्य स्थानिक पातळीवर अधिक आहे. आता तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने या तिन्ही पक्षांची ताकत वाढली असली तरी नेत्यांमधील धुसफूस आणि विरोध आजही कायम असल्याचे खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर स्पष्ट झालंय.
परभणीच्या जिंतुर बाजार समितीच्या प्रशासक नियुक्तीचे निमित करून खासदार संजय जाधव यांनी पक्षप्रमुखांकडे राजीनामा दिला. मात्र केवळ हे एकच कारण आहे की आणखी काही राजकारण याबाबत चर्चा सुरु झाली, ज्यात सर्वात पहिला मुद्दा येतो तो स्थानिक विकास निधीचा युती शासन असताना शिवसेनेचा पालकमंत्री जिल्ह्याला मिळाला अन् महाविकास आघाडीचे शासन स्थापन झाल्यावर तेच पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे गेले आणि इथूनच या गळचेपीला सुरुवात झाली. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या एकमेव पूर्णा नगर परिषदेला अत्यंत कमी आणि भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या नगर परिषदांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. यानंतर जिल्हा परिषदेत शिवसेनेला स्थान मिळाले मात्र कुठल्याही निर्णयात राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद अध्यक्षाकडून विश्वासात न घेता त्यांच्या खात्याचा कारभार परस्पर सुरु आहे हा विषय ही अनेक वेळा चर्चिला गेला. त्यातल्या त्यात जिंतुर बाजार समितीवर मागच्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ आहे. त्यामुळे यावेळी ते प्रशासक पद आम्हाला द्या आणि बोरी राष्ट्रवादीने घ्यावी, असं खासदारांचा आग्रह होता मात्र ते झाले नाही आणि जिंतुरवर राष्ट्रवादीचेच प्रशासक नेमले गेले आणि खासदार संजय जाधव यांच्या घुसमट बाहेर आली, जी व्यक्त करून ते मोकळे झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेना खासदार संजय जाधव यांच्यावर आरोप
हा झाला राष्ट्रवादी आणि त्यांच्यातील वाद आता इतर महत्वाच्या मुद्द्यांकडे वळू. शिवसेनेचे खासदार संजय जाधव हे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी फळी असणारे नेते मात्र त्यांचा मागच्या युती सरकार असल्यापासून परभणी जिल्हा पोलीस दलासोबत संघर्ष सुरूय. त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवाय त्यांचे अनेक वेळा पोलीस अधिकाऱ्यांशी वाद झालेले आहेत. आता खुद्द त्यांचे मुख्यमंत्री आणि सरकार त्यांचे. मात्र असं असताना याबाबत अनेक वेळा त्यांनी तक्रार करूनही काहीच झालेलं नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले मात्र पुढे काहीच झालं नाही. सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असताना याबाबतही निर्णय झालेला नाही. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील मराठवाड्यावर अन्यायकारक असलेले 70-30 चे आरक्षणासाठी त्यांनी अनेक आंदोलन केली. आता स्वातंत्र्यदिनी देखील त्यांनी निदर्शने केली. मात्र काहीच उपयोग झाला नाही. सत्तेत नसताना रस्तावर उतरून आंदोलन करून काम करून घेणाऱ्या सेना खासदारांच्या सत्तेत असून अडचणी वाढल्या आणि त्यातून त्यांनी आपली उद्विग्नताही राजीनाम्यातून व्यक्त केलीय.
परभणीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक, काचा फुटल्या
या सर्व प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे त्यांच्यावर गंभीर आरोप
खासदार जाधव यांनी राजीनामा दिल्यावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी एक व्हिडीओ काढून खासदार संजय जाधव यांनी उगाच काहीही आरोप न करता भाजपला मदत करायची की भाजप ला जिल्ह्यात थांबवायचे आहे, याचा विचार करावा असा थेट आरोप करत एकदा दोन्ही पक्षश्रेठींनी सर्वांना समोरासमोर बसवून काय काय गळचेपी केलीय हे ऐकून घ्यावं असंही आवाहन केलं. शिवाय जिंतूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांनी तर आम्ही आणि खासदार संजय जाधव यांनी बसून जिंतूर बाजार समितीही राष्ट्रवादी आणि बोरी बाजार समितीही शिवसेनेकडे देण्याचे ठरलं होतं, असं म्हणत त्यांचे सर्व आरोपच खोडून काढले आहेत.
राष्ट्रवादीच्या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादी भवनची तोडफोड
काल दुपारी संजय जाधव यांनी राजीनामा दिला त्यांनतर सायंकाळी 8 च्या सुमारास राष्ट्रवादीकडून गंभीर आरोप करणारी प्रतिक्रिया आली आणि रात्री 10 वाजता अज्ञात कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रवादी भवनला लक्ष करत तोडफोड केली. आता ही तोडफोड करताना कुणीही कुणाला पहिलं नाही. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनिकांवर आरोप केले. त्यामुळे या वादात आणखी भर पडलीय.
आज संजय जाधव मुख्यमंत्री यांची होणार भेट
काल राजीनामा दिल्यानंतर रात्री खासदार संजय जाधव यांना मातोश्री वरून भेटीचे निमंत्रण आले आणि ते रात्रीच मुंबईला निघाले. आज सायंकाळी त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक होणार आहे. त्यानंतर ते आपली जाहीर भूमिका मांडणार आहेत.
राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर गळचेपी होत असल्याचा आरोप करत काल परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला होता. मात्र जिल्ह्यात राजीनामा देण्याइतपत परिस्थिती नाही. त्यांची नाराजी होती ती नाराजी आता दूर होईल आम्ही सर्वजण एकत्र आहोत एकत्रच राहणार असल्याची प्रतिक्रिया परभणीचे शिवसेना आमदार राहुल पाटील यांनी दिली. शिवाय कालच्या तोडफोडीचा आणि शिवसैनिकांचा काहीही संबंध नसल्याचे ही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केले आहे.
परभणी जिल्ह्यात अशी आहेत सत्तास्थान
परभणी जिल्ह्यात 4 विधानसभा मतदार संघ आहेत. यातील परभणीत शिवसेना, पाथरी काँग्रेस, जिंतूर भाजप तर गंगाखेड इथे रासपचे आमदार आहेत. त्यातल्या त्यात जिल्ह्यातील 7 पैकी पाथरी, जिंतुर नगर परिषद राष्ट्रवादी, गंगाखेड काँग्रेस, सोनपेठ, मानवत, सेलू भाजप तर केवळ पूर्णा नगरपरिषद ही शिवसेनेकडे आहे. एकुण 11 बाजार समित्या असलेल्या जिल्ह्यात राष्ट्रवादी कडे 6, भाजपकडे 3, काँग्रेस 2 असं संख्याबळ आहे. त्यातल्या त्यात जिल्हा परिषद ही राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे जिथे त्यांनी काँग्रेस आणि सेनेला सोबत घेतले आहे.
एकुणच मागच्या दोन्ही लोकसभेत 2014 ला संजय जाधव यांच्या विरोधात जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे तर 2019 ला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश विटेकर हे राष्ट्रवादीकडून उमेदवार होते. राष्ट्रवादी आणि या दोन्ही उमेदवारांकडून शिवसेनेला पराभूत करण्याचे सर्व प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे या दोघांच्या मतदार संघात खासदार संजय जाधव यांना आपली ताकत वाढवायची आहे. मात्र महाविकास आघाडी त्यात अनेक अडचणी येत आहेत. शिवाय निधी वरून, अनेक कामांवरून सुरु असलेले मतभेद वाढतच चालले असल्याने आता वरिष्ठ पातळीवरून नेमका काय निर्णय होतो. तो खासदार संजय जाधव यांना मान्य होतो का? हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.