Maratha Reservation: नारायण राणे ते अजित पवार, कुणाकुणाच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली?
Maratha Reservation: मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर नेते, मंत्री, आमदारांच्या बंगल्याबाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Maharashtra Maratha Reservation : राज्यातील मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाची धग वाढत आहेच. तसेच, राज्यभरातही मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत जमावाकडून आमदारांचे बंगले लक्ष्य केले जात आहेत. सोमवारी बीडमध्ये (Beed) आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) आणि आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या निवासस्थानाला आग लावण्यात आली. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) कार्यालय देखील जाळण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या (Mumbai News) अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) प्रदेश कार्यालयाची सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर नेते, मंत्री, आमदारांच्या बंगल्याबाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काल बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि नेते जयदत्त क्षीरसागर यांचे बंगले जाळले. शिवाय आमदार प्रकाश सोळंके यांचाही बंगला आंदोलकांनी जाळला. एवढंच नव्हे प्रकाश सोळंकेंच्या बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांनाही आंदोलकांनी आग लावली आहे.
अर्जुन खोतकर, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवेंसह शरद पवारांच्या घराबाहेरी सुरक्षेत वाढ
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले असून आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी आता मराठा आंदोलकांनी नेत्यांच्या घरांवर हल्ला चढवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले असून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकरांच्या जालन्यातील घराची सुरक्षा वाढवली आहे. तर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
शरद पवार, नारायण राणेंसह बड्या नेत्यांच्या घराबाहेर तगडा बंदोबस्त
जालन्यातील संभाजीनगरमधील रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. तर, अजित पवार, नारायण राणेंसह सर्वच महत्वाचे मंत्री आणि नेत्यांच्या घरांभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हिंसक प्रकार टाळण्यासाठी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
अजित पवार गटाच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर दंगल नियंत्रण पथक तैनात
सोमवारी बीड जिल्ह्यात आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानाला आग लावण्याचा प्रकार समोर आला. यासोबतच राष्ट्रवादी जिल्ह्याचे कार्यालय देखील जाळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या अजित पवार गटाच्या प्रदेश कार्यालयाला सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या या परिसरात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलं असून मुंबई पोलिसांची तुकडीदेखील तैनात करण्यात आली आहे.
नागपूरमधील भाजप शहर कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ
नागपूरमधील भाजप शहर कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मंगलम कॉम्प्लेक्स येथील भाजप कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
दोन खासदार, तीन आमदारांचे राजीनामे, मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत कोणी कोणी पद सोडलं?