गडचिरोलीत नाकाबंदीदरम्यान कारच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यू
दरम्यान आरोपी दारुतस्करीत सहभागी होते का, मद्यप्राशन करुन गाडी चालवत होते का? की हा एक अपघात होता याचा तपास पोलीस करत आहेत.
गडचिरोली : गडचिरोलीच्या आरमोरी शहराजवळ नाकाबंदीदरम्यान कारचालकाने पोलीस कर्मचाऱ्याला उडवल्याची घटना रात्री दीड वाजता घडली आहे. 40 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल केवलराम येलुरे यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. येलुरे आरमोरी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
गडचिरोलीत लोकसभा निवडणूक आणि नियमित नाकाबंदी दरम्यान भरधाव येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने केवलराम येलुरे यांना जोरदार धडक दिली. येलुरे यांनी गाडी चालकाला लाईट दाखवून गाडी थांबवण्याचा इशारा दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत चालकाने गाडी थेट येलुरे यांच्या अंगावर घातली.
घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं. गाडीतील दोघेही गडचिरोली येथील रहिवाशी आहेत. मृत पोलीस कर्मचारी केवलराम येलुरे यांना आरमोरी पोलिसांनी शासकीय इतमामात मानवंदना देत पार्थिव गणेशपूर येथे रवाना केलं आहे. तेथेच केवलराम येलुरे यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दरम्यान आरोपी दारुतस्करीत सहभागी होते का, मद्यप्राशन करुन गाडी चालवत होते का? की हा एक अपघात होता याचा तपास पोलीस करत आहेत.