इंधन दरवाढीमुळे त्रस्त परभणीकरांची इलेक्ट्रिक बाईकला पसंती, दीड महिन्यात इलेक्ट्रीक बाईक्स विक्रीत वाढ
इंधन दरवाढीमुळे त्रस्त परभणीकर आता इलेक्ट्रिक बाईक्सला पसंती देत आहेत. गेल्या दीड महिन्यात इलेक्ट्रीक बाईकच्या विक्रीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
![इंधन दरवाढीमुळे त्रस्त परभणीकरांची इलेक्ट्रिक बाईकला पसंती, दीड महिन्यात इलेक्ट्रीक बाईक्स विक्रीत वाढ Petrol diesel price hike parbhani prefer electric bikes इंधन दरवाढीमुळे त्रस्त परभणीकरांची इलेक्ट्रिक बाईकला पसंती, दीड महिन्यात इलेक्ट्रीक बाईक्स विक्रीत वाढ](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/23031042/electric-bike.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
परभणी : मागच्या अनेक दिवसांपासून सतत इंधन दरवाढ सुरु आहे. त्यातल्या त्यात परभणीकरांना राज्यात सर्वात महाग इंधन खरेदी करावं लागत असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. मात्र, हे टाळण्यासाठी आता परभणीकरांनी इलेक्ट्रिक बाईकला पसंती दिलीय. शहरासह जिल्ह्यात झपाट्याने इलेक्ट्रिक बाईक विक्री होत आहे.
मागच्या दीड महिन्यापासुन परभणीचे नाव हे देशपातळीवर चर्चेत आहे, ते इंधन दरवाढीमुळे. कारण देशात आणि प्रामुख्याने राज्यात परभणीत सर्वाधिक पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत. जे आज 100 रुपये प्रतिलिटर पेट्रोल आण 89 रुपये प्रतिलिटर डिझेल एवढ्या दराने विक्री केले जात आहे. इंधनाचे दर प्रचंड वाढल्याने ऑटो प्रवास, दुध, शेतीमाल वाहतुक व इतर ट्रान्स्पोर्टेशनचे दर वाढले आहेत. ज्याचा सर्वसामान्य परभणीकरांना आर्थिक फटका बसतोय.
सततच्या इंधन दरवाढीला वैतागुन परभणीतील अनेकांनी नवीन पर्याय शोधलाय, तो म्हणजे इलेकट्रीक बाईकचा. परभणीतील एलआयसीचे प्रतिनिधी नागेश राजुरकर यांना पॉलिसीसाठी दिवसाकाठी 150 ते 200 किलोमीटर फिरावे लागत होते, त्यासाठी पेट्रोल खर्च जास्त होता. त्यातच भाववाढ होत असल्याने त्यांनी इलेक्ट्रिक बाईक घेतली. मागच्या 3 महिन्यापासुन ते ही बाईक चालवत आहेत. ना पेट्रोल खर्च ना इतर दुरुस्ती खर्च. 2 तास चार्ज करून 60 ते 70 किलोमीटरपर्यंत त्यांची गाडी चालत असल्याने ते खुश आहेत. क्रीडा शिक्षक सुशील देशमुख यांनीही पेट्रोल दरवाढीमुळे इलेट्रीक गाडी घेतली. शाळा, शेती आदी ठिकाणी ते याच गाडीवरून प्रवास करत आहेत. त्यामुळे महिन्याकाठी 6 हजारांची बचत होतेय.
वाहनांचे प्रकार
सध्या अहमदनगर येथील एनकेई कंपनीचे 3 मॉडेल बाजारात आलेत.
- ड्राय बॅटरीवरील वोल्फ मॉडेल, किंमत 52 हजार
- एस 5 मॉडेल, किंमत 62 हजार
- लिथियम बॅटरीवरील निंजा मॉडेल, किंमत 75 हजार
- दणकट बॉडी, आकर्षक डिझाईन, ना आरटीओ पासिंग ना रजिस्ट्रेशनची झंजट. ताशी 35 किलोमीटर असा वेग या गाड्यांचा आहे.
गुजरात मधील जापनीज तंत्रज्ञानाच्या ओकिनावा कंपनीचे 4 मॉडेल बाजारात आलेत.
- प्रेज प्रो-93 हजार 997
- रिज प्लस-82 हजार 991
- आर 30 - 65 हजार 992
- लाईट - 70 हजार 992
- ही गाडी एकदा चार्ज करण्यासाठी 1 युनिट लागते.
- या गाड्यांच्या स्पेअर पार्ट आणि बॅटरीची वॉरंटी 2 वर्षांपर्यंत आहे.
- सर्व गाड्यांचे टायर हे ट्यूबलेस आहेत.
मागच्या काही महिन्यापासुन परभणीत इलेक्ट्रीक बाईक विक्रीच्या 4 वेगवेगळ्या एजेन्सी सुरु झाल्यात. त्यांच्या गाड्यांचा खप हा मागच्या दोन महिन्यात वाढलाय. वरद एजेन्सीतून 70 गाड्या, ओकिनावा एजन्सीतून 67 गाड्या तर इतर 2 एजेन्सीमधून 100 गाड्यांची विक्री झालीय. त्यामुळे सध्या या एजेन्सी धारकांकडे ठेवायलाही गाड्या उरल्या नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)