(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रेल्वेची वेबसाइट हॅक करून तात्काळ तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्याला औरंगाबादमधून अटक
रेल्वेची वेबसाइट हॅक करून तात्काळ तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
औरंगाबाद : रेल्वेची वेबसाइट हॅक करून तात्काळ तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटप्रकरणी औरंगाबादच्या बुढ्ढीलेन भागातून एकाला अटक करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा बलाने ही कारवाई केली आहे. सोहेल अहमद असं आरोपीचं नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील गौडा येथील रहिवासी आहे. दुबईतून वेबसाईट हॅक करणाऱ्या हमीद अशरफ याच्या तो संपर्कात होता. तात्काळ तिकीट बुक करून कमिशनचे पैसे दहशतवाद्याला पुरवले जात होते का याचा तपास पोलीस करत आहेत.
सोहेल रेल्वेची वेबसाइट हॅक करून दुबईत बसून तात्काळची 85 टक्के तिकीट बुक करणाऱ्या हमीद अशरफच्या संपर्कात होता. सोहेल मुळचा उत्तर प्रदेशातील गोडाचा रहिवाशी आहे. गेल्या सहा वर्षांपासून तो औरंगाबादेत वास्तव्यास असून बुढ्ढीलेन भागात तो टेलरिंगचे काम करत होता. रेल्वेची बेवसाईट हॅक करून रेल्वेच्या तत्काळ आरक्षित तिकिटांचे काही मिनिटांत 85 टक्के बुकिंग करणारे रॅकेट दुबईतील हमीद अशरफ चालवत होता. सॉफ्टवेअरद्वारे रेल्वेची बेवसाइट हॅक करून जनरेट झालेली लिंक हमीद दुबईतून भारतातील त्याच्या संपर्कातील लोकांना पाठवत होता.
हमीदकडे भारतातील ज्या 93 लोकांचे मोबाईल क्रमांक सापडले त्यात सोहेल अहमद याचाही समावेश आहे. सोहेल अहमदकडे 30 मोबाईल सीमकार्ड सापडले आहेत. दुबईतील हमीदच्या साहाय्याने भारतात हे रॅकेट चालवणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास आसामच्या गुवाहटीमधून अट केल्यानंतर काल मध्यरात्रीपासून देशभरात 8 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. याच मोहिमेअंतर्गत औरंगाबादेतून सोहेल अहमदला अटक करण्यात आली.
हमीद अशरफ याला यापूर्वी देखील अशाच गुन्ह्यांमध्ये रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्या प्रकरणातून सुटका झाल्यानंतर त्यांने दुबईत जाऊन पुन्हा रेल्वेची वेबसाईट हॅक करायला सुरुवात केली. रेल्वेच्या तात्काळ कोट्यातील आरक्षित तिकिट बुकिंगचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीच्या म्होरक्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या महासंचालकांना टेक्स्ट मेसेज करून डोळ्यात अंजन घातले आहे. माझ्यावर तुम्ही कारवाई केली तर माझे लग्न कसे होईल, त्यापेक्षा रेल्वेची वेबसाईट हॅकच होणार नाही, अशी व्यवस्था तुम्ही करायला हवी, असं या टेक्स्ट मॅसेजमध्ये म्हटलं आहे. सोहेलच्या संपर्कात औरंगाबादमधील आणखी किती लोक होते. सोहेलने ही लिंक आणखी किती लोकांना पुरवली याचा पोलीस तपास करत आहेत. तर खरोखरच दहशतवादाचा ती हा पैसा पुरवला जात होता का याची देखील चौकशी एटीएस करत आहे.