राज्यातली नाकाबंदी कधी उठणार? ई पास रद्द करण्याची मागणी
ई-पास बंद करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. मात्र ई पास रद्द करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती काही केल्या कमी होतान दिसत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी योग्य खबरदारी सरकारकडून घेतली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ई-पास बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला तरी राज्यात ई पास सुरू ठेवणं गरजेचं आहे. ई-पास बंद करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. मात्र ई पास रद्द करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.
एस टी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ई पास आवश्यक नसल्याने स्पष्ट करण्यता आलं आहे. मात्र खासगी वाहनांना अजूनही ई पास बंधनकारक आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. ई-पास काढण्यासाठी नागरिकांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. राज्यात सर्व काही पूर्वपदावर येत असल्याने अशा पद्धतीने पासची सक्ती करण्यात येऊ नये अशी प्रवाशांची भावना आहे.
दरम्यान ई-पास बंधनकारक केल्यामुळे काही जण याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील काही ठिकाणी बोगस पास बनवणारी टोळी कार्यरत आहे. राज्यभरातून या प्रकरणी अनेक तक्रारी करण्यात आल्या आणि अनेकांना या कृत्यामुळे अटकही झाली.
नाकाबंदीवेळी कित्येक प्रवासी अत्यावश्यक कारणांसाठी प्रवास करत असतात. मात्र अशावेळी त्यांच्याकडे पास असेलच अशी परिस्थिती नसते. त्यावेळी त्यांना पास नसल्यास देखील प्रवेश द्यावा लागतो. तर काही वेळेस पास नसणारे काही लोक सुसाट गाडी चालवत, नाकाबंदीला लावण्यात आलेले बॅरिकेडसुद्धा तोडून पळून जातात. रात्रीच्यावेळी नाकाबंदी करत असताना अशा लोकांमुळे इतर प्रवाशांना धोका निर्माण होत असल्याची भावना नाकाबंदीवर ड्युटी करत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने व्यक्त केली. त्यामुळे ई-पास केवळ सोपस्कार म्हणून किंवा कर्मकांडापुरतेच मर्यादित राहिल्याची स्थिती दिसून येत आहे.