पुणे जमीन घोटाळ प्रकरण! शीतल तेजवानीनंतर दुय्यम निबंधक रवींद्र तारुलाही अटक, बावधन पोलिसांची कारवाई
मुंढव्यातील 40 एकर जमीन घोटाळाप्रकरणी शीतल तेजवानी नंतर दुय्यम निबंधक रवींद्र तारुला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पुणे : मुंढव्यातील 40 एकर जमीन घोटाळाप्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला पुणे (Pune) पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची चौकशी देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. शीतल तेजवानी नंतर दुय्यम निबंधक रवींद्र तारुला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बावधन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
वादग्रस्त जमीन व्यवहाराचा दस्त करणारे दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांना अटक
पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीच्या वादग्रस्त जमीन व्यवहाराचा दस्त करणारे दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बावधनच्या दुय्यम निबंधक कार्यालयात हा दस्त झाला होता. शीतल तेजवानीला या प्रकरणी पुणे पोलिसांनी आधीचं अटक केली आहे. आता नियमबाह्य दस्त करणाऱ्या तारु यांना बावधन पोलिसांनी भोरच्या घरातून अटक केली आहे.
1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी
पुण्यात मुंढवा येथील 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा आरोप करण्यात आला होता. महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवालही या निमित्ताने विरोधकांकडून उपस्थित केला. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसांत हा व्यवहार झाला होता. हे प्रकरण माध्यमांमध्ये आल्यानंतर संबंधित व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पार्थ पवार यांचे वडिल अजित पवार यांनी माध्यमांसमोर येऊन दिली होती. दरम्यान, या प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं.
























