Parbhani : ऊसतोड कामगाराचा डॉक्टर मुलगा देतोय मृत्यूशी झुंज, डॉ. राहुल पवारला हवंय मदतीचं बळ
अत्यंत हालाखीच्या परिस्थीतीतून शिक्षण घेत डॉक्टर होऊन लोकांची सेवा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या राहुल पवार या तरुणाला कोरोनाने गाठलं आहे. त्याची मृत्यूशी झुंज सुरु असून समाजातील दानशूर लोकांनी मदतीसाठी पुढं येण्याची गरज आहे.
परभणी : आई वडील ऊसतोड कामगार, एक लहान भाऊ, तांड्यावर राहून आपला संसार चालवणाऱ्या आई-वडिलांची परिस्थिती बदलून स्वतः डॉक्टर होण्याचे स्वप्न एका 25 वर्षीय तरुणाने पाहिले. मात्र हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच या तरुण डॉक्टरला कोरोनाने गाठलं. आज हा डॉक्टर मृत्यूशी झुंज देतोय. त्याला गरज आहे मदतीची. परिस्थिती आणि कोरोनाशी झुंज देणाऱ्या डॉक्टरला आज गरज आहे ती मदतीची. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
परभणीच्या पाथरी तालुक्यातील आनंद नगर तांडा येथील डॉ. राहुल विश्वनाथ पवार हा तरुण आपल्या आई-वडिलांना ऊस तोडण्याच्या कामांमध्ये मदत करायचा. त्यांच्याच पाठिंब्यावर लातूर येथील एमआयटी कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करुन रुग्णांची सेवा करण्याचे त्याने स्वप्न बघितले.'महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स' या युनिव्हर्सिटीची एमबीबीएस अंतिम वर्षाची परीक्षा गतवर्षी एप्रिल महिन्यात पार पडली. मार्चदरम्यान लेखी परीक्षा तर 16 ते 23 मार्च दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा झाली. कोरोनाची लक्षणे असतानाही या दोन्ही परीक्षा राहुलने पुर्ण तयारीनिशी दिल्या. परीक्षा नाही दिल्यास सहा महिने बॅक राहतात. त्यात परिस्थिती हालाखीची असल्याने हे परवडणारे नव्हते. म्हणून राहुलनेही परीक्षेलाच प्राधान्य दिले. परीक्षा झाल्यानंतर राहुलला कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला. शिवाय म्युकरमायोसीसचीही लागण झाल्यामुळे त्याला 1 मेपासून औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दिवसेंदिवस राहुलची प्रकृती गंभीर होत आहे. सध्या त्याला कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. दवाखान्याचा खर्च लाखोंच्या पटीत आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयामध्ये राहुल मृत्यूशी झुंज देतोय. आई-वडील ऊसतोड मजूर असल्याने कर्ज काढून त्यांनी आतापर्यंत अडीच लाख रुपये खर्च करून त्याच्यावर उपचार केले. मात्र आता परिस्थिती आणखी बिघडली आहे.आता त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत. त्यामुळे त्यांनी मदतीसाठी विनंती केलीय. शिवाय त्याच्या मित्रांनीही सोशल माध्यमातुन मदतीसाठी प्रयत्न सुरु केलेत.
दरम्यान एक होतकरू तरुण डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतो. त्याला कोरोनाची लागण होते आणि त्याची मृत्यूशी झुंज सुरु होते. मात्र परिस्थिती नसल्याने MGM रुग्णालयानेही त्याच्यावर मोफत उपचार करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे काहीसा ताण कमी झाला असला तरी महागडी औषध आणि इतर खर्चासाठी त्याला अधिक मदत मिळणं गरजेचं आहे.
रुग्णसेवेचा वसा घेत तांड्यावरून आपलं आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य बदलण्यासाठी डॉ. राहुलने आतापर्यंत झुंज दिलीय. तो यातून सहीसलामत बाहेर पडावा यासाठी आपण सर्वच प्रार्थना करूयात. सोबत त्याला मदतही मिळवून देऊयात. म्हणजे तो पुढे जाऊन आपली रुग्णसेवा करीत राहील अशी भावना एमजीएमचे डॉ, प्रवीण सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
एमआयटी मेडिकल कॉलेजचे डीन नबाबसाब जमादार म्हणाले की, "डॉ. राहुल पवार उपचार घेत असताना पोस्ट कोविड च्या आजाराने त्यास ग्रासले आहे. त्यासाठी आवश्यक असणारे इंजेक्शन प्रशासनाने उपलब्ध करून द्यावे. एमआयटी मेडिकल कॉलेज मॅनजेमेंट आणि कर्मचारी विद्यार्थी सगळा आर्थिक भार उचलण्यास सक्षम आहेत.आम्ही काल रात्री पासून एमजीएम मेडिकल कॉलेजशी संपर्क ठेवून आहोत. उपचार कसे सुरु आहेत ? काय आवश्यक आहे याची माहिती घेत आहोत. आता आवश्यकता आहे ती इन्जेक्शनची. त्यासाठी मंत्री राजेश टोपे, मंत्री अमित देशमुख आणि तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क करतोय. आवश्यक असणाऱ्या इंजेक्शनवर शासकीय नियंत्रण आहे, ते बाहेर मिळत नाहीत. ते उपलब्ध करून द्यावेत."
डॉ. राहुल पवार यांना आपणही मदत करु शकता.
डॉ राहुल विश्वनाथ पवार,
स्टेट बँक ऑफ इंडिया,
शाखा पाथरी .
खाते क्र. 35075282295
IFSC CODE:- SBIN0003801
महत्वाच्या बातम्या :
- Tarun Tejpal Case Verdict : तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना गोवा कोर्टाचा दिलासा, बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
- Mucormycosis : केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद, चार राज्यांनी केलं Black Fungus ला महामारी घोषित
- CM Uddhav Thackeray : दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होताच मदतीची घोषणा करणार : मुख्यमंत्री