(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mucormycosis : केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद, चार राज्यांनी केलं Black Fungus ला महामारी घोषित
Black Fungus : देशात कोरोनासोबत ब्लॅक फंगसचाही धोका वाढतोय. त्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू, ओडिशा, गुजरात आणि चंदीगडने ब्लॅक फंगसला महामारी घोषित केली आहे.
नवी दिल्ली : केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत आता तामिळनाडू, ओडिशा, गुजरात आणि चंदीगडने ब्लॅक फंगसला महामारी घोषित केली आहे. या तीन राज्यांनी आणि एका केद्रशासित प्रदेशाने गुरुवारी तसं जाहीर केलं. तेलंगणा आणि राजस्थान या दोन राज्यांनी ही निर्णय आधीच घेतला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्यांना आवाहन
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ब्लॅक फंगसला एपिडेमिक डिसिजेस अॅक्ट, 1897 अन्वये महामारी जाहीर करावं असं आवाहन सर्व राज्यांना केलं होतं. केंद्रीय मंत्रालयाने या संबंधी सर्व राज्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये, खासकरुन ज्यांना डायबेटिसचा त्रास आहे त्यांच्यामध्ये ब्लॅक फंगसचा धोका वाढत असल्याचं सांगितलं होतं. ब्लॅक फंगसच्या रुग्णांसंबंधी सर्व माहिती रुग्णालयांनी आणि त्या-त्या राज्यांनी देणं बंधणकारक असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
देशात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. या रुग्णांचे प्रमाण महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांत जास्त आहे. आतापर्यंत देशात 7521 ब्लॅक फंगसची प्रकरणं समोर आली आहेत. त्यामध्ये 219 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत ब्लॅक फंगसचे 1500 रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुजरातमध्ये 1163 रुग्ण सापडले तर 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये 575 रुग्ण सापडले असून 31 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच हरियाणा, दिल्ली, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा या राज्यातही ब्लॅक फंगसचे रुग्ण मोठ्य प्रमाणावर आढळले आहेत.
आयसीएमआरने काही दिवसांपूर्वी सुचना जारी केली असून त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, हा संसर्ग झाल्यास डोळे, गाल आणि नाक यांच्यावर परिणाम होतो.ब्लॅक फंगसमुळे फुफ्फुसांना संसर्ग होतो आणि श्वासोश्वासामध्ये अडचणी येतात.
या आजारावर लवकर उपचार केले नाही तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरित परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहेत. या आजाराचे लवकर निदान होणं गरजेचं असल्यानं त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे.
काय आहे ब्लॅक फंगस?
कोरोना उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. सामान्यतः श्वास घेताना युब्युक्युटस नावाचे जीवाणू नाकामध्ये जातात. परंतु रोगप्रतिकार शक्ती संतुलीत नसेल तर म्युकोरमायकॉसिस या बुरशीची वाढ होते. कोरोनानंतर व्यक्तीमधील रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. तसेच मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची शक्यता आहे. चेहऱ्यावर सूज येणे, गाल दुखणे, डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे, डोके दुखणे, नाक दुखणे, रक्ताळ किंवा काळसर जखम ही सर्व म्युकोरमायकॉसिसची लक्षणं आहेत.
कोरोनातून बरं झाल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण सातत्यानं तपासावं. कोणत्याही औषधांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आयसीएमआरच्या निर्देशकांचे पालन करावं असं आवाहन आयसीएमआरने केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Tarun Tejpal Case Verdict : तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना गोवा कोर्टाचा दिलासा, बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
- Coronavirus Cases in India : देशात गेल्या 24 तासात 2.59 लाख नव्या रुग्णांची भर तर 4209 रुग्णांचा मृत्यू
- International Tea Day 2021 : डोकेदुखीवरचा 'राष्ट्रीय उपाय', एक कप चहा आणि बरंच काही...