(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं, पंकजा मुंडे यांचं ट्वीट
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट इथे भगवान भक्ती गडावर घेतलेल्या ऑनलाईन दसरा मेळाव्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे.
बीड : ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी याबाबत ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे. "गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं आहे," असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट इथे ऑनलाईन दसरा मेळावा घेतला होता. परंतु अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये 40 ते 50 जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, खासदार भागवत कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी कोणतंही सोशल डिस्टन्स पाळलं नाही. आपत्ती व्यवस्थापना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन त्यांनी केले नाही, असा आरोप त्यांच्यावर आहे.
परंतु याबाबत पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या आहेत की, "परवानगी घेऊन गेले असतानाही गुन्हा दाखल झाला आहे. आधी माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आता तेच सत्र माझ्यापर्यंत आलं आहे."
अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली.. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 26, 2020
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पाथर्डीच्या आमदार मोनिका राजुरे, जिंतूरच्या मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, सविता गोल्हार, विजय गोल्हार, सुवर्णा लांबरुड, संदेश सानप, राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे आणि अन्य 40-50 जणांचा समावेश आहे. त्यांच्यावर कलम 188, 269, 270 सह कलम 51(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागच्या दोन वर्षापासून पंकजा मुंडे या भगवान बाबाच्या जन्मगावी म्हणजे सावरगाव घाट येथील दसरा मेळावा घेतात. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा ऑनलाईन झाला. पंकजा यांनी सावरगावात येऊन भगवान बाबांचे दर्शन घेत सावरगावातून समर्थकांना संबोधित केले. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू आहेत, असं असताना सावरगावात मेळावा नसूनही पंकजा येणार असल्याने शेकडो समर्थक जमले होते म्हणून आपत्ती निवारण कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या पंकजा मुंडेंच्या विरोधात गुन्हा दाखल
...नाहीतर उसाच्या फडातून कामगार बाहेर आणू, पंकजा मुंडेंचा इशारा
Beed | सोशल डिस्टन्सिंगन न पाळत ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या पंकजा मुंडेंच्या विरोधात गुन्हा दाखल