(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या पंकजा मुंडेंच्या विरोधात गुन्हा दाखल
पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, खासदार भागवत कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड : ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या पंकजा मुंडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये 40 ते 50 जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, खासदार भागवत कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकजा मुंडे यांनी सावरगावमध्ये ऑनलाईन दसरा मेळावा घेतला होता. या मेळाव्यासाठी कोणीही हजर राहू नये, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यामुळे गावातील लोकांशिवाय बाहेरचे कुणी फारसे लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. मात्र पंकजा मुंडे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी कोणतंही सोशल डिस्टन्स पाळलं नाही. आपत्ती व्यवस्थापना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन त्यांनी केले नाही.
...नाहीतर उसाच्या फडातून कामगार बाहेर आणू, पंकजा मुंडेंचा इशारा
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पाथर्डीच्या आमदार मोनिका राजुरे, जिंतूरच्या मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, सविता गोल्हार, विजय गोल्हार, सुवर्णा लांबरुड, संदेश सानप, राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे आणि अन्य 40-50 जणांचा समावेश आहे. कलम 188, 269, 270 सह कलम 51(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागच्या दोन वर्षापासून पंकजा मुंडे या भगवान बाबाच्या जन्मगावी म्हणजे सावरगाव घाट येथील दसरा मेळावा घेतात. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा ऑनलाइन झाला. पंकजा यांनी सावरगावात येऊन भगवान बाबांचे दर्शन घेत सावरगावातून समर्थकांना संबोधित केले. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू आहेत, असं असताना सावरगावात मेळावा नसूनही पंकजा येणार असल्याने शेकडो समर्थक जमले हाेते म्हणून आपत्ती निवारण कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed #DussehraMelava शर्यतीत असेन, तोडणाऱ्यांनाही उत्तर देणार, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला