...नाहीतर उसाच्या फडातून कामगार बाहेर आणू, पंकजा मुंडेंचा इशारा
सरकारच्या चांगल्या कामांचं कौतुकही करेल मात्र मागण्यांसाठी रस्त्यावर उतरेल, असं भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने सावरगावच्या भगवान भक्ती गडावर पार पडला. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.
बीड : कुणीतरी म्हटलं उसतोड कामगारांचे निर्णय मुंबईत बसून होत नाही. उसतोड कामगारांचे निर्णय धाब्यावर बसून होतात का? उसतोड कामगारांचे निर्णय घेण्यासाठी फडातच जावं लागत असं नाही. पंकजा मुंडेंच्या विरोधात स्टेटमेंट केले की हेडलाईन होते. मुंडे साहेब साखर कारखानदार होते ते पण ऊसतोड कामगारांचे नेतृत्व करायचे. लवाद नको असे कोण मागणी करतेय. शरद पवारांनी आता पुढची बोली करावी. ऊसतोड कामगार स्वाभिमानी आहेत. 27 तारखेच्या बैठकीत जो निर्णय होईल ते जाहीर करा नाहीतर उसाच्या फडातून कामगार बाहेर आणू, असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने सावरगावच्या भगवान भक्ती गडावर पार पडला. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी निवडणुकीत पराभूत झाले माझ्या पेक्षा कार्यकर्ते जास्त खचले. रस्त्यावर कसे उतरायचे हे आम्हाला चांगले माहीत आहे. ऊसतोड कामगारांचा मेळावा हा एका राजकीय पक्षाचा कसा काय? असं म्हणत त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका केली. त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंनी 10 हजार कोटींचं पॅकेज घोषित केलं. मी त्यांचं स्वागत करते. मात्र शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्यासाठी हे पॅकेज पुरेसं नाही. शेतकऱ्यांचे अत्यंत हाल झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घ्यावा अन्यथा विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरावं लागेल.
पंकजाताई आता घरा बाहेर येणार नाहीत अशा चर्चा करत होते. मला येण्यासाठी कोरोनामुळं परवानगी मिळाली नाही. मुंडेसाहेबांचं दर्शन मी ऑनलाईन घेतलं. मात्र भगवान बाबांच्या दर्शनाशिवाय दसरा मेळावा होऊच शकत नाही. तुम्ही आलातच मी ही रिस्क घेतली. मीही मास्क काढून टाकला. मी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. कुणी फुलांनी स्वागत केलं, कुणी अश्रुंनी स्वागत केलं. माझ्या दारा समोरची गर्दी कधी कमी होऊ देऊ नको अशी मागणी देवा जवळ केली असल्याचं त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रभर दौरा काढणार
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी निवडणुकीत हरले. माझ्यापेक्षा पराभूत माझे कार्यकर्ते वाटते. मी म्हटलं काय तुम्ही मनावर घेतलंय. साहेब आपल्यातून गेले यापेक्षा मोठी घटना आहे का ही. 'जिंदगी की रेस में जो लोग आपको दौडकर हरा नहीं सकते. वो आपको तोडकर हराने में लगते है.' मी या रेसमध्ये जीव तुटेपर्यंत पळत राहील, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आपल्या पाच वर्षातील कामांची उद्घाटनं अजून होत आहेत, असं त्या म्हणाल्या. मी महाराष्ट्रभर दौरा काढणार आहे, ज्याच्या डोळ्यात अश्रू आहेत त्या माणसा सोबत पंकजा मुंडेला आणि त्यांच्या कार्यकर्त्याला पोहोचावे लागणार आहे, असंही त्या म्हणाल्या.
गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न होतं त्याप्रमाणं शिवाजी पार्क वर ही हा मेळावा आपण घेऊ. एक दिवस हा मेळावा शिवतीर्थावर घेणार असं सांगताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर झाले. मी ज्या ज्या मतदार संघात निवडून आणले त्या प्रत्येक मतदार संघाची मी आमदार आहे, असंही त्या म्हणाल्या.
ऊसतोड कामगार हा या मेळाव्याचा प्राण
माझ्यासाठी ऑनलाईन दसरा मेळाव्यात बोलणे हे मोठे आव्हान आहे. दसरा मेळाव्यात दर वर्षी मागच्या वर्षी पेक्षा जास्त गर्दी व्हायची या वर्षी मात्र कॅमेरा समोर बोलावे लागेल. ऊसतोड कामगार हा या मेळाव्याचा प्राण आहे, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सकाळी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं होतं. ऊसतोड कामगारांच्या बाबतीत निश्चित या मेळाव्यात ऐकायला मिळेल. ऊसतोड कामगारांचं नेतृत्व हे गरीब कष्टकऱ्यांच नेतृत्व आहे. ऊसतोड कामगारांसाठी कुणीही काम केले तरी त्यांचं स्वागतच आहे. पण त्यांचा हेतू राजकारण करण्याचा नसावा. प्रकाश आंबेडकरांचा हेतू चांगलाच आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, मी ऊसतोड कामगारांना मी आवाहन करतेय. यावेळी जे जे भूमिका व्यक्त करतायेत त्यांचं मी स्वागतच करते.मी कारखानदार नाहीच, ऊसतोड कामगाराचे हित बघणारी आहे. त्यांनी म्हटलं की मी कोयता देते तुम्हाला पण तुमचा विश्वास तोडणार नाही.
पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने सावरगावच्या भगवान भक्ती गडावर पार पडला. भगवानगडावर दसऱ्या दिवशी राजकीय संदेश देण्याची परंपरा होती. मात्र, भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांच्या सोबत वाद झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी दोन वर्षांपासून भगवान बाबांच्या जन्मगावी म्हणजे सावरगावमध्ये भगवान भक्तिगड उभा केला आहे. याच ठिकाणी दसऱ्या दिवशी पंकजा मुंडे भगवान बाबाचे दर्शन घेऊन याच ठिकाणी त्या दसरा मेळावा घेत असतात. यावर्षी हा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडला. त्यामुळे दसरा मेळाव्याला न येता घरी राहून भगवान बाबांची पूजा करून हा दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं होतं.