क्रिकेट खेळताना गुप्तांगाला बॉल लागला अन् तरुणाचा जीव गेला; पंढरपुरातील धक्कादायक घटना
Pandharpur News Update: पंढरपूरमधील एका गावात क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना गुप्तांगाला चेंडू लागल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Pandharpur News Update: क्रिकेट (Cricket News) हा खेळ असा आहे जो गावागावात, गल्लीगल्लीत खेळला जातो. मात्र क्रिकेट खेळताना आवश्यक ती काळजी न घेतल्यानं अनेकदा दुर्घटना घडतात. अशीच एक धक्कादायक घटना पंढरपुरात (Pandharpur Live News) घडली आहे. पंढरपूरमधील एका गावात क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना गुप्तांगाला चेंडू लागल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विक्रम क्षीरसागर असं या तरुणाचं नाव आहे.
पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे या क्रिकेट स्पर्धा सुरू होत्या. विक्रम क्षीरसागर हा 35 वर्षाचा खेळाडू नेपातगाव या टीमकडून बॅटिंग करीत होता. समोरच्या टीमच्या वेगवान गोलंदाजने टाकलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने हा चेंडू विक्रमच्या गुप्तांगाला लागला आणि तो मैदानातच कोसळला. त्याला तातडीने उपचारासाठी हलवले मात्र यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ग्रामीण भागात विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धा होत असतात. मात्र क्रिकेट खेळताना लागणारी संरक्षक साधने, गार्डस या खेळाडूंकडे नसल्याने असे दुर्दैवी प्रकार होतात.
क्रिकेट खेळताना काळजी घेणं आवश्यक
क्रिकेट हा खेळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडता. गल्लीपासून ते भव्य दिव्य मैदानांपर्यंत खेळला जाणारा हा खेळ. गावोगावी क्रिकेटचं फॅड आहे. मुलं तहानभूक विसरुन क्रिकेट खेळत असतात. मात्र क्रिकेट खेळताना म्हणावी तशी काळजी घेतली जात नाही. गार्ड किंवा हेल्मेट गावांकडे क्रिकेट खेळताना वापरलं जात नाही. त्यामुळं डोक्याला चेंडू लागणे किंवा शरीराच्या इतर अंगाना चेंडू लागून खेळाडू जखमी होण्याच्या अनेक घटना समोर येतात. यात खेळाडू गंभीर जखमी होतात किंवा काही वेळा जीवानिशी जातात. पंढरपुरातील ही घटना देखील सुरक्षेची साधनं न वापरल्यामुळंच घडली आहे.
क्रिकेट खेळताना मैदानावर हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूंच्या मृत्यूचा काही घटना देखील अलीकडच्या काळात घडल्या आहेत. अनेकदा स्पर्धांचं आयोजन केलं जातं मात्र तिथं कुठल्याही सुविधा नसतात. प्राथमिक उपचारांची सोय नसते. त्यामुळं खेळाडूंना जीव धोक्यात घालून खेळावं लागतं. त्यामुळं क्रिकेट खेळताना काळजी घेणं आवश्यक आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
CWG 2022 : भाविना पटेलची कमालं! पॅरा टेबल टेनिसमध्ये भारताला सुवर्णपदक, सोनलबेनने जिंकलं कांस्य
Avinash Sable Wins Silver : आयुष्यातील अडथळ्यांची शर्यत पूर्ण करणारा बीडचा अविनाश साबळे