Pandharpur: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी भाविकांकडून भरभरून दान; यंदा खजिन्यात तब्बल सव्वा कोटी अधिक रक्कम
गरीबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठुरायांची श्रीमंती वाढू लागली आहे. कार्तिकी यात्रेदरम्यान विठुरायाच्या खजिन्यात रोख रकमेबरोबरच सोन्या चांदीच्या दागिन्यांची ही मोठी भर पडली आहे.
Pandharpur Kartiki Ekadashi Update: कोरोनाच्या दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात झालेल्या कार्तिकी यात्रेमध्ये विठुरायाच्या चरणी भविणकडून तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांचे भरभरून दान अर्पण करण्यात आले आहे. गरीबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठुरायांची श्रीमंती वाढू लागली आहे. कार्तिकी यात्रेदरम्यान (Kartiki Ekadashi Update) विठुरायाच्या खजिन्यात रोख रकमेबरोबरच सोन्या चांदीच्या दागिन्यांची ही मोठी भर पडली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपस सव्वा कोटी अधिक उत्पन्न
नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी यात्रेदरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 3 कोटी 20 लाख 59 हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये भक्तनिवास, लाडू प्रसाद, देणगी पावती, दागिने, देवाच्या पायाजवळ भाविकांनी अर्पण केले दान असे मिळून मंदिर समितीला 3 कोटीहून अधिक रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत मंदिर समितीला 1 कोटी 20 लाख रूपयांचे अधिक उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे.
कोरोना काळात मंदिराच्या उत्पन्नात घट
कोरोना काळात मंदिर दोन वर्षे बंद होते. त्यामुळे मंदिराच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. आषाढी नंतर झालेल्या कार्तिकी मोठी भरेल अशी अपेक्षा असताना परतीच्या पावसाचा फटका बसल्याने यात्रेकरूंची संख्या निम्म्याने घटली होती. तरीही देवाच्या खजिन्यात भाविकांनी भरभरून दान दिले आहे. यात्रा काळात भाविकांनी देणगी स्वरुपात मंदिराला 3 कोटी 20 दान अर्पण केले असून यात सोने, चांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. दोन वर्षांनंतर झालेल्या या यात्रेला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळं यंदा दान देखील भरभरुन आलं आहे.
फडणवीस दाम्पत्याच्या हस्ते झाली होती महापूजा
यंदा कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi)निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली होती. तर यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शिरोड गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. विठ्ठल हा सामान्य माणसांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा देव आहे. त्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावेत, असं फडणवीसांनी म्हटलं होतं. मंदिर परिसरात कॉरीडॉर तयार करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. विकासकामं करत असताना पंढरपूरची कोणतीही परंपरा खंडीत होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असंही त्यांनी म्हटलं होतं.