(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बिल्डरांना पाच हजार कोटींची सूट तर गरीब शेतकऱ्यांकडून पाच हजार कोटीची लूट, देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल
ओबीसी व भटक्या समाजाचे निवडणुकीतील आरक्षणाचा हक्क राज्यातील नालायक सरकारमुळे गेला असून आता या समाजाला येत्या निवडणुका सर्व साधारण प्रवर्गातून लढव्या लागणार असल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.
पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते आज मंगळवेढा आणि पंढरपुरात प्रचारसभा घेत आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. कोरोना काळात शेतकरी अडचणीत असताना या महावसुली सरकारने गेल्या दोन महिन्यात शेतकऱ्यांची वीज तोडणी करून पाच हजार कोटीची वसुली केली तर मुंबई बिल्डरांना मात्र पाच हजार कोटींची सूट दिली. कारण ते यांना मालपाणी देतात असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीसांच्या या सभांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचं चित्र होतं.
स्टेजवर जरी जास्त गर्दी नसली तरी जाहीर करूनही गर्दीचे नियम पाळण्यात भाजपला अपयश आले. येत्या 2 मे रोजी पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये देशातील विरोधी पक्षांना जोरदार धक्के बसणार असून राज्यातही तुम्ही आघाडी सरकारला धक्का द्याल, असं फडणवीस यांनी सांगितले. यावेळी खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, खासदार रणजित निंबाळकर यांचेसह चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील व अनेक नेते उपस्थित होते.
ओबीसी व भटक्या समाजाचे निवडणुकीतील आरक्षणाचा हक्क राज्यातील नालायक सरकारमुळे गेला असून आता या समाजाला येत्या निवडणुका सर्व साधारण प्रवर्गातून लढव्या लागणार असल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. सुप्रीम कोर्टाने वारंवार सांगूनही या सरकारने कमिशन नेमले नाही आणि त्यामुळे आता न्यायालयाच्या आदेशापर्यंत ओबीसी व व्हीजे प्रवर्गातील मागास समाजाला निवडणूक ओपनमधून लढावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Pandharpur By-election : पंढरपुरात प्रचारसभांचा जोर अन् कोरोना रुग्णवाढही जोरात!
मंगळवेढा तालु्क्यातील दुष्काळी 35 गावांना पाणी देण्याचे आश्वासन हे लबाड सरकार गेल्या तीन निवडणुकात देऊन जिंकत आले आहे. पण या लोकांना पाण्याचा थेंबही मिळालेला नाही. आता केंद्रातून पैसे आणून येत्या साडेतीन वर्षात या दुष्काळी जनतेला पाणी देण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. या निवडणुकीवर सरकार अवलंबून नसल्याच्या अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना महाराष्ट्रात काय होणार हे लवकरच दिसेल असा टोला त्यांनी लगावला. या सभेत धनगर नेते गोपीचंद पडळकर, राम शिंदे, कोळी महासंघाचे नेते रमेश पाटील उपस्थित होते.