Ashadhi Wari 2022 : आषाढीसाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांनी मास्कचा वापर करावा; पालकमंत्री दत्तात्रय भरणेंचे आवाहन
Pandharpur Ashadhi Wari 2022 : आषाढीच्या वेळी पंढरपुरात मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी भाविकांनी मास्कचा वापर करावा असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे.
Pandharpur Ashadhi Wari 2022 : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने दोन वर्षानंतर होत असलेल्या आषाढी वारीवर कोरोनाचे सावट वाढू लागले आहे. यंदा विक्रमी आषाढी यात्रा भरणार असून 15 लाखांपेक्षा जास्त भाविक आषाढीला येण्याचा अंदाज प्रशासनाला आहे. परंतु, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आषाढीला येणाऱ्या प्रत्येक भाविकाने खबरदारी म्हणून मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे मागच्या दोन वर्षांपासून पंढरपूरमधील आषाढी वारी झाली नव्हती. परंतु, गेल्या दोन-तीन महिन्यापासून कोरोना रूग्णांमध्ये घट होत असल्यामुळे राज्य सरकारने वारीला आणि पायी पालख्यांना परवानगी दिली. त्यामुळे वारीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनासोबत बैठक घेतली. यावेळी भरणे यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचे सेंटर वाढवण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी कोरोनाचे डोस घेण्यासह आषाढीला येणाऱ्या प्रत्येक भाविकाने खबरदारी म्हणून मास्क घालण्याचे आवाहन मंत्री भरणे यांनी केले.
आषाढीच्या वेळी पंढरपुरात मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी भाविकांनी मास्कचा वापर करावा असे पालकमंत्री भरणे यांनी म्हटले आहे. यासोबतच कोरोनाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनालाही सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची देखील आज बैठक झाली. या बैठकीत सर्वाधिक रुग्णवाढ असलेल्या पाच जिल्ह्यांबाबत खबरदारी घेण्यावर चर्चा झाली. गेल्या 7 दिवसांत राज्यातली कोविड रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. गेल्या आठवडाभरात राज्यातील रुग्णांमध्ये 130.84. % ची वाढ झाली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे हे पाच जिल्हे नवे हॉटस्पॉट ठरत आहेत. 4.31 % लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
राज्यात सोमवारी 1036 कोरोना रूग्णांची नोंद
आज राज्यात 1036 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 374 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 676 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज कोरोनाच्या शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 374 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,38, 938 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.03 टक्के इतकं झालं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांमुळे आरोग्य विभागासह संबंधित सर्वच विभाग सतर्क झाले आहेत.