(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pandharpur Bypoll | कासेगावच्या प्रचारसभेत अजित पवारांची तुफान टोलेबाजी; पडळकर, पाटील यांना चिमटे
कासेगाव इथल्या शेवटच्या सभेत अजित पवार मोकळेपणाने आणि आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. "ज्याला स्वतःचे डिपॉझिट वाचवता आलं नाही तो तुम्हाला सल्ले देतोय," अशा शब्दात गोपीचंद पडळकरांची खिल्ली उडवली. तर "ज्याला दोनवेळा आमच्या दत्तामामाने पाडले तो आता मते मागायला आलाय," असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांना लक्ष्य केलं.
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल (8 एप्रिल) दिवसभर प्रचारसभा घेतल्या. मात्र संध्याकाळी ते खऱ्या अर्थाने खुलले आणि कासेगावच्या शेवटच्या सभेत आपल्या शैलीत तुफानी टोलेबाजी करत गोपीचंद पडळकर आणि हर्षवर्धन पाटील यांची टर उडवली. "सध्या एक नेता तुमच्याकडे जोरदार भाषणे करत फिरतोय, त्याचे डिपॉझिट सुद्धा त्याला बारामतीमध्ये वाचवता आलं नव्हतं आणि आता हा कोणाच्या तोंडाने मतं मागतोय? ज्याला स्वतःचे डिपॉझिट वाचवता आलं नाही तो तुम्हाला सल्ले देतोय," असे म्हणत अजित पवार यांनी धनगर नेते आमदार गोपीचंद पडळकर यांची खिल्ली उडवली.
यानंतर काल दिवसभर पंढरपूर तालुक्यात जोरदार प्रचार केलेले माजी मंत्री आणि अजित पवार यांचे विळा-भोपळ्याचे सख्य असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना लक्ष केलं. हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले की, "ज्याला दोनवेळा आमच्या दत्तामामाने पाडले तो आता मते मागायला आलाय." हा मोठा पुढारी, उंचपुरा आणि अनेक वर्षे मंत्री राहिलेला असे हर्षवर्धन पाटील यांचं वर्णन करत टोलेबाजी केली. "20-20 वर्षे मंत्री असूनही लोकांचीही कामे केली नाहीत म्हणून तुम्हाला तुमच्या घराच्या लोकांनी पाडले आणि आता बाहेर जाऊन तुम्ही काय सांगणार कोणाला मत द्या ते?," असे म्हणत हर्षवर्धन पाटलांना लक्ष्य केलं. "एखाद्याने तुम्हाला विचारले असते तुम्ही का पडलात तर काय उत्तर देणार असा सवाल करत खिल्ली उडवली.
"आपलं तसं नाही, आपल्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे, आपलं नाणं खणखणीत कारण आपल्यामागे चुलता उभा आहे. शरद पवार हे नाव आपल्या पाठीशी आहे आणि शेवटपर्यंत राहणार हे लक्षात ठेवा, असे सांगत राष्ट्रवादीला विजयी करण्याचे आवाहन केल.
दरम्यान काल सकाळी कल्याण काळे यांच्या प्रवेश सभेला झालेल्या गर्दीमुळे संपूर्ण राज्यभर अजित पवार आणि राष्ट्रवादीला लक्ष करण्यात आले होते. त्या तणावात अजित पवार यांनी गाडेगाव आणि खर्डी येथील सभा घेतल्या. मात्र कासेगाव इथल्या शेवटच्या सभेत अजित पवार मोकळेपणाने आणि आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत बोलले.