Palghar : पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसैनिकांच्याही 'संपर्कक्षेत्राबाहेर'? शिवसैनिकांची नाराजी
स्थानिक शिवसैनिकांमध्ये पालकमंत्री दादा भूसे यांच्याविषयी आत्मीयता राहिली नसून अनेक महत्त्वपूर्ण जाहिरात फलकांमधून पालकमंत्र्यांना वगळले जात असल्याचे दिसून येतंय.

पालघर : जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून जिल्ह्याच्या समस्यांकडे पुरेशा प्रमाणात लक्ष दिले जात नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी आहे. त्यापुढे जाऊन स्थानिक शिवसैनिकांमध्ये देखील पालकमंत्री यांच्याविषयी आत्मीयता राहिली नसून अनेक महत्त्वपूर्ण जाहिरात फलकांमधून पालकमंत्री यांना वगळले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांबरोबर शिवसैनिकांनादेखील पालकमंत्री ‘संपर्क क्षेत्राबाहेर’असल्याचं जाणवत आहे.
कोरोनाच्या दोन्ही लाटेदरम्यान पालघर जिल्ह्यात उपचारासाठी अपुरी व्यवस्था असताना त्यासंदर्भात आढावा बैठक घेणे व तातडीच्या उपाययोजना आखण्यात पालकमंत्री अपयशी ठरले होते. दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोना उपचारासाठी औषधे, इंजेक्शन तसेच प्राणवायू साठा जिल्ह्याला कमी प्रमाणात मिळत असताना खंबीर पालकत्वाचा अभाव असल्याची जाणीव पालघरवासीयांना झाली होती. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेत जिल्ह्याला लस मिळण्यास राज्याकडून दुजाभाव होत असताना पालकमंत्री यांचे प्रयत्न व वजन कमी पडल्याचे वैद्यकीय क्षेत्रात चर्चा आहे. तर काही महिन्यांपूर्वी विरोधकांकडून सुद्धा पालकमंत्री गायब असल्याचे बॅनर पालघर शहरात झळकले होते.
गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्तीबाधित झालेल्या काही शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा व इतर काही ठिकाणी अनुदान नुकसान भरपाई प्राप्त झालेले नाही. यंदाच्या वर्षी तौक्ते चक्रीवादळात शेतकरी व बागायतदारांना मंजूर झालेल्या नुकसान भरपाईच्या रक्कमेवर शेतकरी वर्ग नाराज आहे. शिवाय चिकू बागायतदारांना फळ पीक योजनेअंतर्गत असलेल्या विम्याच्या संरक्षित रकमेच्या 85 टक्के विमा हप्ता आकारला गेल्याने चिकू उत्पादकांमध्ये देखील कृषीमंत्री तथा पालकमंत्री यांच्या भूमिकेबद्दल नाराजी आहे.
मालेगाव येथून मुंबईकडे येताना काही प्रसंगी पालकमंत्री मोखाडा, जव्हार- वाडा मार्गे वसई-विरार महानगरपालिका भागाला भेट देऊन किंवा आढावा बैठक घेऊन मुंबईला रवाना झाल्याचे दिसून आले आहे. मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या पालघर व डहाणू तालुक्यातील बंदरपट्टी भागातील समस्यांकडे, मच्छीमारांच्या समस्यांकडे पालकमंत्री यांनी पुरेशा प्रमाणात लक्ष न दिल्याने शिवसैनिकांमध्येच त्यांच्या विषयी नाराजी आहे.
त्याचप्रमाणे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना पालकमंत्र्यांकडून अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याने अनेक महत्त्वपूर्ण निर्णयासाठी व मदतीसाठी पालघरचे शिवसेना नेते ठाण्यामध्ये आसरा घेत असतात दिसून आले आहे. त्याची प्रचिती पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवण्यात आलेल्या जाहिरात फलकामधून दिसून आली आहे.
पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर दादा भुसे यांनी आजवर पालघरमध्ये प्रसार माध्यमांशी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला नाही किंवा जिल्हा नियोजन समिती बैठकीनंतर माहितीदेखील दिली नाही. जिल्ह्यत वेळोवेळी उद्भवणाऱ्या विविध समस्यांसंदर्भात पत्रकारांनी पालकमंत्री यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसे. अशीच परिस्थिती जिल्ह्यतील सर्वसामान्य नागरिकांवर सोसावी लागत असून पालकमंत्री आता शिवसैनिकांच्या ही संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, याबाबत दादा भुसे यांना वारंवार संपर्क साधूनही ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे विरोधकांत बरोबरच महाविकास आघाडीच्या तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची पालकमंत्र्यांवरती असलेल्या नाराजीची चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Aditi Ashok : गोल्फमधील भारताच्या आशा मावळल्या, अदिती अशोकचं पदक थोडक्यात हुकलं, चौथ्या स्थानावर राहिली अदिती
- Amazon-Future Group Deal : मुकेश अंबानींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका, रिलायन्स-फ्यूचर कराराला स्थगितीचा आदेश
- काँग्रेसचं मिशन मुंबई; राहुल गांधी 28 डिसेंबरला मुंबई दौऱ्यावर, शिवतीर्थावर सभा घेणार




















