Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं लग्न ठरलं, मुंबईतील बड्या उद्योगपतीच्या घराण्याची लेक तेंडुलकरांची सून होणार
Arjun Tendulkar Engaged with Saania Chandok : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा साखरपुडा झाला आहे.

Arjun Tendulkar Engagement मुंबई : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाला आहे. अर्जुन तेंडुलकरचं लग्न सानिया चांडोक हिच्यासोबत ठरल्याचं वृत्त काही इंग्रजी आणि हिंदी माध्यमांनी दिलं आहे. सानिया चांडोक ही मुंबईतील उद्योगपती रवि घई यांची नात आहे. अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा एका खासगी समारंभात झाला. हा साखरपुडा दोन्ही कुटुंबांचे जवळचे लोक आणि मित्रांच्या उपस्थितीत पार पडला. घई कुटुंब मुंबईतील नामांकित उद्योजक आहे. इंटरकाँन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी या आयसक्रीम ब्रँडची मालकी घई कुटुंबाकडे आहे.
अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघाकडून खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मुंबईकडून त्यानं 2020-21 मध्ये करिअरला मुंबईकडून सुरुवात केली होती. हरियाणा विरुद्ध टी 20 सामन्यात त्यानं पदार्पण केलं होतं. मुंबईकडून खेळण्यापूर्वी अंडर 19 क्रिकेटमध्ये अर्जुन तेंडुलकरनं भारतीय संघाकडून क्रिकेट खेळलं होतं.
सानिया चांडोक कोण आहे?
मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची सानिया चांडोक नात आहे. घई कुटुंब हॉस्पिटलिटी आणि अन्न उद्योगात कार्यरत आहे. भारत सरकारच्या कॉर्पोरेट अफेअर्सच्या माहितीनुसार सानिया चांडोक ही डेसिगन्टेड पार्टनर आणि संचालक म्हणून Mr.Paws Pet Spa and Store LLP कार्यरत आहे. रवी इक्बाल घई हे मुंबईतील उद्योग जगामधील आघाडीचं नाव आहे. ते ग्राविस हॉस्पिटलिटी लिमिटेडचे चेअरमन आहेत.
अर्जुन तेंडुलकरची कारकीर्द
अर्जुन तेंडुलकरनं आतापर्यंत 17 प्रथमश्रेणी सामने, 18 लिस्ट ए आणि 24 टी 20 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी सामन्यामध्ये अर्जुन तेंडुलकरनं 33.51 च्या सरासरीनं 37 विकेट घेतल्या आहेत. तर, 23.13 च्या सरासरीनं 532 धावा केल्या आहेत. लिस्ट ए मध्ये अर्जुनच्या नावावर 25 विकेट आहेत तर त्यानं 102 धावा केल्या आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये अर्जुन तेंडुलकरनं 27 विकेट घेतल्या आहेत. तर, 119 धावा केल्या आहेत. अर्जुन तेंडुलकर सध्या गोवा संघाकडून खेळतो. आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकर यानं मुंबई इंडियन्सकडून 5 सामने खेळले असून त्यानं 3 विकेट घेतल्या आहेत. तर, त्याच्या नावावर 13 धावा आहेत.
दरम्यान, सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांचं लग्न 24 मे 1995 रोजी झालं होतं. अंजली तेंडुलकर सचिन पेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 तर अर्जुन तेंडुलकरचा जन्म 24 सप्टेंबर 1999 ला झाला आहे.





















