बोईसरमध्ये लसीचा काळा बाजार शिवसैनिकांकडून उघड, वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं
एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना कोविड लसीची कमतरता भासवायची आणि दुसरीकडे त्यांच्यासाठी आलेल्या लसीचा काळाबाजार सुरु करायचा हा प्रताप पालघरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे.
पालघर : राज्यात अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा असताना पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना लसीचा काळाबाजार उघड झाला आहे (Palghar Black market of covid vaccine). चक्क वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा काळाबाजार केल्याचं समोर आलं आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना कोविड लसीची कमतरता भासवायची आणि दुसरीकडे त्यांच्यासाठी आलेल्या लसीचा काळाबाजार सुरु करायचा हा प्रताप वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे.
पालघर जिल्ह्यातील घोलवडच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने कोविडचे डोस थेट तारापूर औद्योगिक क्षेत्रात विकल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील एका कारखान्यात हा प्रकार होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेच्या निलम संखे यांनी कारखान्यात धाड टाकून हा संपूर्ण प्रकार चव्हाट्यावर आणला आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट नं. इ 125 या सियाराम सिल्क या कापड निर्मिती करणाऱ्या कारखान्यात गुरूवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास शासकीय वैद्यकीय अधिकारी बेकायदेशीर लसीकरण करत असल्याची माहिती समोर आली. घोलवड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उमेश अहिरे यांनी याठिकाणी सुमारे 100 कोविड लसीचे डोस चोरून काळाबाजार करण्यासाठी आणल्याची माहिती सुत्रांकडून शिवसैनिकांना प्राप्त झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तातडीने याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या निलम संखे यांना याबाबत कळविल्यानंतर कारखान्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी कामगारांना कोविड लसीकरण करत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे याठिकाणी वैद्यकीय अधिकारी उमेश अहिरे हे स्वतः उपस्थित होते.
कारखाना प्रशासनाने याअगोदर देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून कामगारांना शासकीय लस चोरट्या मार्गाने दिल्याचे उघड झाले आहे. गुरुवारी समोर आलेल्या प्रकारात कंत्राटी कामगारांना लसीकरण करण्यासाठी प्रत्येकाकडून 250 रूपये घेण्यात आले होते. हे सर्व जमा केलेले पैसे वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले जातात. यातच कंपनीकडून देखील विशेष आर्थिक सहकार्य देखील केले जात असल्याचे समोर येत आहे. ज्यावेळी वैद्यकीय अधिकारी उमेश अहिरे यांना जाब विचारल्यावर त्यांनी याठिकाणी मी सहज आलो होतो. मला माहिती नाही याठिकाणी लसीकरण कोणी केले अशी उडवाउडवीची उत्तर देत कारखान्याच्या दुसऱ्या मजल्या वरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. डॉ. उमेश अहिरे यांचा खोटा मुखवटा समोर आला असून कोविड लसीचा काळाबाजार करणाऱ्या डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
लसीकरणाचा धंदा
पालघरचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यावरदेखील या अगोदर बेकायदेशीर लसीकरण केल्याबाबत कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी सुधारण्याच्या मानसिकतेमध्ये नसून कोविड लसीचा काळाबाजार सुरूच ठेवण्यात आला आहे. एकीकडे नागरिकांना दिवसभर रांगेत उभे राहूनदेखील लसीकरण करता येत नसताना दुसरीकडे चोरट्या मार्गाने सुरू असलेल्या लसीकरणावर जिल्हा प्रशासनाचे कोणतेही लक्ष नसल्याने दिसून येते.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मिलिंद चव्हाण यांनी दिली आहे. दुसरीकडे हा प्रकार उघड झाल्यानंतर यात अजून कोण मोठे अधिकारी गुंतले आहेत का याचीही चौकशी करण्याची मागणी शिवसैनिकांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या :