(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध; अकोले, श्रीरामपूरमध्ये आंदोलन
दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास न करता जायकवाडीला पाणी देण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याची टीका अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी केली आहे.
अहमदनगर : मराठवाड्याला पाणी देण्यास अहमदनगर जिल्ह्यातून विरोध तीव्र होत आहे. आज नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आंदोलन करण्यात आली. अकोले शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं, श्रीरामपूर शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, तर राहाता शहरात शेतकऱ्यांनी एकत्र येत निषेध सभा घेतली.
जायकवाडीला पाणी सोडू नये, ही प्रमुख मागणी आता जोर धरू लागली आहे. मराठवाड्याला जाणाऱ्या पाण्याचा प्रवास आता प्रादेशिक वादावर येऊन सुरु झाला आहे.
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्याला पाणी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर आता या निर्णयाचा विरोध करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरू लागले आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी आज आंदोलन करण्यात आली. आमच्या भागात दुष्काळी परिस्थिती असताना जायकवाडीला पाणी देऊ नये अशी मागणी जोर लागली आहे. दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास न करता जायकवाडीला पाणी देण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याची टीका अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड आणि किसान सभेचे अजित नवले यांनी आज अकोले शहर बंद ठेऊन जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाचा निषेध केला. आज झालेल्या बंदमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन अकोले 100 टक्के बंद ठेवण्यात आला. उद्या भंडारदरा धरणाचे चाक बंद करण्याचा इशारा पिचड व नवले यांनी दिला आहे.
दरम्यान श्रीरामपूरमध्ये आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. औरंगाबाद-संगमनेर मार्गावर रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदविला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु असून राहाता शहरात शेतकऱ्यांनी एकत्र येत सरकारच्या विरोधात निषेध सभा घेतली.