शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा डाव; आमदार रोहित पवारांचा दावा
Maharashtra Politics : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा डाव आहे, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
Maharashtra Politics : शिवसेनेनंतर (Shiv Sena) राष्ट्रवादी (NCP) फोडण्याचा डाव आहे, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. पवार कुटुंबात (Pawar Family) फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रकारेच पवार कुटुंबातही फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केले आहेत. शिवसेनेनंतर आम्हालाही लक्ष्य केलं जाऊ शकतं अशी शक्यताही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच, असं सांगताना रोहित पवारांनी आमच्या कुटुंबात कोणतेही हेवेदावे नसून, सर्वांचं उद्दिष्ट स्पष्ट असल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं.
"खासदार सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) लोकसभेत, अजित पवारांना (Ajit Pawar) राज्यात आणि मला सध्या जे करत आहे तेच काम करण्याची इच्छा आहे. पण विरोधकांना ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रमाणे आमच्या कुटुंबात फूट पाडायची आहे. पवार कुटुंबात अंतर्गत भांडण असेल तर राष्ट्रवादी फुटेल असं विरोधकांना वाटतंय. शिवसेनेनंतर आम्ही पुढील टार्गेट असू शकतो.", असा थेट दावा रोहित पवार यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात आणि रोहित पवार यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या चर्चा आपण अनेकदा ऐकल्यात. यासंदर्भात मुलाखतीत विचारलं असता, ते म्हणाले की, "अजित पवार यांनीच मला जिल्हा परिषद आणि आमदारकीचं तिकीट दिलं. माझं लग्नही त्यांनीच ठरवलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा तुम्हाला मोठं व्हायचं असतं, तेव्हा आपल्या लोकांसोबत स्पर्धा करायची नसते. आम्ही कौटुंबिक भांडणात वेळ वाया घालवत नाही."