5 october In History : फातिमा बिबी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश, स्टिव्ह जॉब्जचे निधन; आज इतिहासात
On This Day In History : आजच्या दिवशी इतिहासात फातिमा बिबी या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश बनल्या. तसेच रामनाथ गोएंका यांचे आजच्या दिवशी निधन झालं आहे.
मुंबई: बंगालमधील महसूल व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी 5 ऑक्टोबर 1805 रोजी लॉर्ड कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धत राबवण्याचा निर्णय घेतला. तसेच जगभरात संगणक आणि मोबाईलच्या क्षेत्रात क्रांती आणण्याच्या कार्यात अग्रेसर असणारे आणि अॅपलचे संस्थापक स्टिव्ह जॉब्ज यांचे 5 ऑक्टोबर 2011 रोजी निधन झालं. जाणून घेऊया आजच्या दिवस इतिहासातील कोणत्या घटनांचा साक्षीदार आहे.
1676- ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीला नाणे पाडण्यासाठी मंजुरी दिली
भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराला सुरुवात केल्यानंतर 5 ऑक्टोबर 1676 रोजी ब्रिटिश सरकारने त्यांना नाणे पाडण्यासाठी परवानगी दिली. मुंबईत पाडण्यात आलेल्या या नाण्याला रुपया आणि पैसा असं नाव देण्यात आलं होतं.
1805- लॉर्ड कॉर्नवॉलिस याचं निधन
लॉर्ड कॉर्नवॉलिस हा 1786 ते 1805 या काळात भारताचा गव्हर्नर जनरल होता. त्याने युरोपात उत्तम सेनापती आणि मुत्सद्दी म्हणून लौकिक मिळविला होता. भारतीय संस्थानिकांच्या अंतर्गत प्रश्नामध्ये त्याने लक्ष घालण्याचं टाळलं. बंगालमध्ये त्याने कामयधारा पद्धत लागू केली. तसेच कंपनीच्या नोकरांनी खासगी व्यापार करू नये, म्हणून नोकरांचे पगार त्याने वाढवून दिले आणि त्यांस भक्कम पेन्शन ठरवून देऊन लाचलुचपतीला आणि त्यांच्या खासगी व्यापाराला आळा घातला. मुलकी व दिवाणी नोकरांना पगार व कामे ठरवून देण्यात आली. लॉर्ड कॉर्नवॉलिसने श्रीरंगपट्टनमच्या लढाईत टीपू सुलतानचा पराभव केला.
1864- कोलकातामध्ये भूकंप, 60 हजार लोकांचा मृत्यू
आजच्या दिवसी 5 ऑक्टोबर 1864 रोजी कोलकाता शहरात भूकंप झाला. त्यामध्ये 60 हजार अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
1975- हॉलिवूड अभिनेत्री केट विन्सलेटचा जन्म
हॉलिवूडची अभिनेत्री केट विन्स्लेट हीचा जन्म 5 ऑक्टोबर 1975 रोजी झाला होता. केट एलिझाबेथ विन्स्लेटच्या अनेक भूमिका गाजल्या. टायटॅनिक या चित्रपटातील भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. तिला द रीडर या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. याशिवाय तिला तीन बॅफ्टा पुरस्कार, चार गोल्डन ग्लोब आणि इतर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. विन्स्लेटने द टायटॅनिक, सेन्स अँड सेन्सिबिलिटीझ, इटर्नल सनशाइन ऑफ द स्पॉटलेस माइंड यासारख्या चित्रपटांत अभिनय केला.
1989- फातिमा बिबी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश बनल्या
भारतातील पहिल्या महिला न्यायाधीश अशी ओळख फातिमा बिबी यांची आहे. 5 ऑक्टोबर 1989 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली. त्यांचे पूर्ण नाव मीरा साहिब फातिमा बीवी असे आहे. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1927 रोजी केरळमधल्या पतनमतिट्टा या गावात झाला.
1991- रामनाथ गोएंका यांचे निधन
इंडियन एक्सप्रेस समुहाचे संस्थापक आणि देशातील पत्रकारितेचा स्तंभ मानल्या जाणाऱ्या रामनाथ गोएंका यांचे 5 ऑक्टोबर 1991 रोजी निधन झालं.
1998- बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग प्रस्तावाची शिफारस
अमेरिकेच्या राजकीय इतिहासात खळबळ माजवणाऱ्या तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लेव्हेन्स्की यांच्या प्रेम प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर त्यांच्यावर 5 ऑक्टोबर 1998 रोजी महाभियोग प्रस्तावाची शिफारस करण्यात आली. 21 सप्टेंबर 1998 रोजी या दोघांच्या प्रेम प्रकरणाचा व्हिडीओ लोकांसमोर आला होता. त्यानंतर यावर बिल क्लिंटन यांनी ज्युरी समोर यासंबंधी आपला जबाब दिला. हा जबाब सर्व माध्यमांवर प्रसारित करण्यात आला होता. त्यानंतर बिल क्लिंटन यांना राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
2011- स्टिव्ह जॉब्जचे निधन
जगभरात संगणक आणि मोबाईलच्या क्षेत्रात क्रांती आणण्याच्या कार्यात अग्रेसर असणारे आणि अॅपलचे संस्थापक स्टिव्ह जॉब्ज यांचे 5 ऑक्टोबर 2011 रोजी निधन झालं. जिद्द आणि मेहनतीच्या जीवावर स्टिव्ह जॉब्जने जगभराच्या मार्केटला नवी दिशा दिली.