24th January In History : डॉ. होमी भाभा यांचे अपघाती निधन, पंडित भीमसेन जोशी यांचा स्मृतीदिन; आज इतिहासात
On This Day : भारतीय अणू संशोधन कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. तर, स्वरभास्कर भारतरत्न भीमसेन जोशी यांचाही आज स्मृतीदिन आहे.
24th January In History : अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 24 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. भारताच्या अणू संशोधन कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे, भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा जहांगीर यांचा स्मृतीदिन आहे. त्याशिवाय, ब्रिटनचे माजी पंतप्रधान, नोबेल पुरस्कार विजेत विस्टन चर्चिल, स्वर भास्कर पंडित भीमसेन जोशी यांचाही स्मृतीदिन आहे. तर, मराठी अभिनेत्री हंसा वाडकर यांची जयंती आणि चित्रपट निर्माते सुभाष घई यांचा वाढदिवस आहे.
1924: अभिनेत्री हंसा वाडकर यांचा जन्मदिवस (Hansa Wadkar Birth Anniversary)
मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांची जयंती. वयाच्या 13 व्या वर्षापासून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली. हंसा वाडकर यांचे मूळ नाव रतन साळगावकर होते. सांगत्ये ऐका, लोकशाहीर रामजोशी, विजयाची लग्ने, संतसखू, रामशास्त्री, आजाद, नवजीवन, धन्यवाद, मेरे लाल आदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. 'सांगत्ये ऐका' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
1945: सुभाष घई यांचा वाढदिवस (Subhash Ghai Birthday)
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, निर्माते, लेखक-पटकथाकार सुभाष घई यांचा वाढदिवस आहे. सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. विश्वनाथ, कालीचरण, हिरो, कर्मा, राम-लखन, कर्ज, परदेस, खलनायक, ताल, यादें, आदी गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
1965: विस्टन चर्चिल यांचा स्मृतीदिन (Wiston Charchile Death Anniversary)
दुसऱ्या महायुद्धादरम्यानचे ब्रिटनचे पंतप्रधान असलेले विस्टन चर्चिल यांचा स्मृतीदिन. प्रभावी वक्ता आणि नेता म्हणून त्यांची प्रतिमा होती. चर्चिल हे साहित्यिकदेखील होते. त्यांना 1953 मध्ये साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला होता.
1966: डॉ. होमी भाभा यांचा स्मृतीदिन (Dr. Homi Bhabha Death Anniversary)
भारतीय अणू संशोधन कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. होमी भाभा यांचा आज स्मृतीदिन. भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांच्या पुढाकाराने अणू ऊर्जा आयोगाची स्थापना झाली. त्याचे प्रमुख म्हणून डॉ. भाभा यांनी जबाबदारी सांभाळली. अणू ऊर्जेचा वापर हा शांततेच्या मार्गाने व्हावा, अशी त्यांची ठाम भूमिका होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1948 साली त्यांनी पंतप्रधान नेहरुंच्या सहकार्याने अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. डॉ. भाभांचे अणुऊर्जेमधील संशोधन लक्षात घेता 1955 साली त्यांना आंतरराष्ट्रीय अणुशक्ती परिषदेचे अध्य़क्षपद देण्यात आले. डॉ. भाभांच्या प्रयत्नामुळेच 1956 साली ट्रॉम्बे येथे भारतातलीच नव्हे तर आशियातील पहिली अणुभट्टी 'अप्सरा' उभारण्यात आली. त्यानंतर 'सायरस' आणि 'झर्लीना' या अणुभट्ट्याही उभारण्यात आल्या.
एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले. हा अपघात नसून घातपात असावा अशी शंका घेणारी चर्चा सुरू असते. डॉ. होमी भाभा यांच्या निधनामुळे भारताच्या अणू कार्यक्रमाला मोठा धक्का बसला.
2011: भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा स्मृतीदिन (Pandit Bhimsen Joshi Death Anniversary)
स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा आज स्मृतीदिन. भीमसेन जोशी यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' ने गौरवण्यात आले. भीमसेन जोशी हे लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते. ’सवाई गंधर्व’ म्हणून ख्यातनाम असलेले रामभाऊ कुंदगोळकर यांच्या मार्गदर्शनात भीमसेन जोशी यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे ख्याल गायक म्हणत असले तरी त्यांनी 1940 च्या दशकात लखनौमध्ये एक वर्ष राहून तेथील ख्यातनाम गायकांकडून ठुमरी शिकून घेतली होती. ते ठुमरीही अतिशय छान गात. भीमसेन जोशींनी 'संतवाणी' या नांवाने मराठी अभंगगायनाचे अ़क्षरशः हजारो कार्यक्रम केले. कवी वसंत बापट त्यांच्या अभंगवाणी कार्यक्रमात अनेकदा अतिशय सुरेख निरूपण करीत.त्यांनी आपले गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ सुरू केलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव समजला जातो. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने अध्यासन स्थापण्यात आले आहे.
भीमसेन जोशी यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराआधी पद्मश्री, पद्मभूषण या नागरी पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. त्याशिवाय, 1976 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला.
भीमसेन जोशी यांनी पुण्यात वयाच्या 88 व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला.
इतर महत्त्वाच्या घडामोडी:
1857: दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना
1916: नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणास्तव अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.
1942: दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांकडून बँकॉकवर बॉम्बहल्ला; थायलंडने इंग्लंड आणि अमेरिकेविरोधात युद्ध पुकारले.
1966: भारताच्या तिसर्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी पार पडला.
1976: बर्मा शेल या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीज असे नामकरण. त्यानंतर 1977 मध्ये पुन्हा नाव बदलून भारत पेट्रोलियम असे नामकरण करण्यात आले.
1984: अॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.
2005: गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यात सक्रीय सहभाग घेणार्या स्वातंत्र्यसेनानी अनुताई लिमये यांचे निधन