CM Eknath Shinde : खासदार मुलगा श्रीकांत शिंदेंच्या घराणेशाहीवर सीएम शिंदे म्हणतात, पक्षाला तेव्हा तरुण, उच्चशिक्षित चेहरा हवा होता
CM Eknath Shinde : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीवर बोलताना पहिल्यांदा घरंदाज असावं लागतं अशा शब्दात पीएम मोदींच्या टीकेचा समाचार घेतला होता.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडताना विरोधी पक्षाती घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला होता. या टीकेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी घराणेशाहीवर बोलताना पहिल्यांदा घरंदाज असावं लागतं अशा शब्दात पीएम मोदींच्या टीकेचा समाचार घेतला होता. तसेच कल्याण डोंबिवलीचा दौरा करताना गद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालायचा आहे, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांच्या घराणेशाहीवर सुद्धा आसूड ओढला होता.
पक्षाला तेव्हा तरुण, उच्चशिक्षित चेहरा हवा होता
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, तेव्हा पक्षाची गरज होती. तरुण, उच्चशिक्षित चेहरा हवा होता. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीमुळे पक्षाला एक जागा मिळाली ती जागा आपण जिंकली. राज्यात विकासाची जी काम सुरू आहेत आणि ज्या पद्धतीने काम सुरू आहेत त्याला केंद्राचा पाठिंबा मिळत आहे. डबल इंजिनसमोर कामाची उद्घाटने होतात.
मोदी कुठे तुम्ही कुठे? त्यांच्या नखासारखे तरी आहात का?
पीएम मोदी यांच्यावर ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरही एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. शिंदे म्हणाले की, मोदी कुठे तुम्ही कुठे? त्यांच्या नखासारखे तरी आहात का? मोदी देशाला उंचीवर नेत आहेत, तुम्ही घरात बसून राज्य 10 वर्षे मागे टाकलं म्हणून आम्ही तुम्हाला पलटवलं. मागे गेलेलं राज्य आता पुढे चाललं आहे. बंद पडलेले प्रकल्प पुढे नेत आहोत. मेट्रो शिवडीसह अनेक प्रकल्प तुम्ही बंद केले. आपल्या अहंकारापोटी प्रजेला मागे नेणं राज्याच्या जनतेचा नुकसान करणं हे दुर्दैवी आहे. ज्यांच्या पोटात पोटदुखी होते त्यांच्यासाठी आपला दवाखाना आहे, त्यात इंजेक्शन आणि गोळ्याही मिळतात, असाही टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, डीप क्लिन ड्राइव्ह मोहिमेवर ते म्हणाले की, आपण सुरुवात केली आहे, डीपमध्ये जाऊन सफाई येते. सार्वजनिक स्वच्छालय स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत. प्रदूषणही कमी झालं आहे. पीएम नरेंद्र मोदी यांनी मंदिर स्वच्छ करण्याचा संकल्प केला आहे. आम्हीही मंदिराची स्वच्छता करतोय आणि आयुक्तांना मंदिर आणि त्याचा परिसर स्वच्छ करून रोषणाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मिलिंद देवरांवर काय म्हणाले?
मिलिंद देवरांच्या प्रवेशावर म्हणाले की, त्यांचा पक्षप्रवेश होत असेल तर मी त्यांचं स्वागत करतो.
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर ते म्हणाले की, हा बाळासाहेबांचा पक्ष आहे. तोच आम्ही पुढे नेत आहोत. बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी सत्तेसाठी सर्व सोडणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी बेइमानी केली. विश्वासघात केला त्यांना आमच्यावरती टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ती संस्था चांगली असते. त्यांच्या विरोधात लागतो तेव्हा ती संस्था वाईट असते त्याच्यावर आरोप करतात. याला जनता सडेतोड उत्तर येणाऱ्या निवडणुकीतील देईल.
इतर महत्वाच्या बातम्या