Ajit Pawar NCP : लोकसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळला; राज्यसभा निवडणुकीसाठी अजितदादांचा शिलेदार ठरला!
एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या वाटेला येत असलेल्या एका राज्यसभेच्या जागेवर नितीन पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
Ajit Pawar NCP : लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सातारामधील (Satara News) वाईमध्ये झालेल्या राजकीय सभेमध्ये बोलताना साताऱ्याची जागा निवडून आणल्यास नितीन पाटील यांना खासदार करतो, असा शब्द दिला होता. आता हा शब्द अजित पवार यांनी पूर्ण केल्याची चर्चा आहे. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या वाटेला येत असलेल्या एका राज्यसभेच्या जागेवर नितीन पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
नितीन पाटील सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष
नितीन पाटील वाई महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत. नितीन पाटील सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (Satara District Central Cooperative Bank) अध्यक्ष आहेत. त्यामुळे अजित पवार गटाकडून राज्यसभेच्या एका जागेवर उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. सोमवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यसभेच्या एका जागेवर उमेदवार देण्यावर चर्चा झाली. यावेळी नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.
अजित पवारांकडून नितीन पाटील यांच्यासाठी शब्द
सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना तिकीट मिळण्यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील यांचे भाऊ नितीन पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. राष्ट्रवादी काँग्रेसही या जागेसाठी आग्रही होती. मात्र, जागावाटपात ही भाजपला सोडण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. त्यावेळी अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांनी लग्नाच्या निमित्ताने मौन बाळगताना कार्यकर्त्यांना संभ्रमावस्थेत ठेवले होते. मात्र, अजित पवारांनी जाहीर सभेतून नितीन पाटील यांना खासदारकीचा शब्द दिला होता.
नितीन पाटील हे माजी खासदार दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव व आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, तेव्हा मोठ्या नेत्यांनी त्यांना साथ दिली होती. त्यामध्ये लक्ष्मणराव पाटील यांचा समावेश होता. नितीन पाटील हे बोपेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच असून ते दुसऱ्यांदा जिल्हा बँकेवर संचालक म्हणून निवडून गेले आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांना थेट अध्यक्षपदाची संधी मिळाली.
इतर महत्वाच्या बातम्या