Mahant Ramgiri Maharaj : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महंत रामगिरी महाराजांविरोधात मुंबईत आणखी एक गुन्हा दाखल
महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध मुंबईतील वांद्रेमधील निर्मल नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पायधुनी पोलिसांमध्येही महंत रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Mahant Ramgiri Maharaj : मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिलेल्या महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद करण्याची मालिका सुरूच आहे. महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध मुंबईतील वांद्रेमधील निर्मल नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याआधी मुंबईतील पायधुनी पोलिसांमध्येही महंत रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जाणीवपूर्वक बोलून दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप
मोहम्मद पैगंबर आणि त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्याची मालिका सुरू आहे. रामगिरी महाराज यांच्यावर जाणीवपूर्वक बोलून दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे. निर्मल नगर पोलिसांनी महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध कलम 196(1), (अ), 197(1)(डी), 299,302, 352, 353(1)(बी), 353(1)(सी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 353 आयपीसी (2), एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
मुख्यमंत्र्यांना हटवा, काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाईंची मागणी
दरम्यान, रामगिरी महाराज यांना अटक झाली पाहिजे. उद्या कोणी उठलं आणि रामाबद्दल बोललं तर चालेल का? असा सवाल माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे. ते म्हणाले, धर्माचा आदर करणारा आपला समाज आहे. ईदला हिंदू आणि दिवाळीला मुस्लिम बांधव शुभेच्छा देतात, ही देशाची परंपरा आणि संस्कृती आहे. या लोकांना संस्कृती बदलायची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना हलवलं पाहिजे, असला मुख्यमंत्री चालू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी कांही तरी डोकं चालवून काम करावं, अशी टीका हुसेन दलवाई यांनी केली.
महंत रामगिरी म्हणाले, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला
या सगळ्या वादानंतर महंत रामगिरी यांनी आपली बाजू स्पष्ट केली होती. मी मुस्लीम समाज आणि मोहम्मद पैगंबरांविषयी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही, असे त्यांनी सांगितले. मी तेढ निर्माण होण्यासारखे काहीही बोललो नाही. माझ्या दीड तासांच्या प्रवचनातील मोजका भाग एडिट करण्यात आला. भीष्माचार्य आणि धर्मराज याबाबतीत प्रवचन देत होतो. त्यात राजधर्म काय असतो. राजधर्माचे राजाने कसे पालन करावे? अन्याय सहन करू नये, असे उदाहरण देताना बोललो. हा मुद्दा मांडत असताना बांगलादेशचा विषय पुढे आला. हिंदुंवर अत्याचार होतात त्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे, अत्याचाराच्या घटना वाईट आहेत. या विरोधात संघटित झाले पाहिजे, मजबूत राहीले पाहिजे, असे मी बोललो. कोणाचा द्वेष मत्सर करायचा नाही. कोणाला त्रास द्यायचा नाही. पण कोणी देत असेल तर सहन करायचे नाही. आम्ही जो बोललो ते ग्रंथात लिहिले आहे. वेगळे काही बोललो नाही, आम्ही शांतताप्रिय आहोत, असे महंत रामगिरी यांनी म्हटले होते.
इतर महत्वाच्या बातम्या