(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाना पटोले यांच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, भाजप आक्रमक
काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणीची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नाना पटोले यांच्याविरोधात भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या विधानाचा भाजप नेत्यांनी निषेध करत त्यांच्यावर टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले होते नाना पटोले
भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या.रविवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो' असे वक्तव्य केले होते. या संबंधिचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
हा व्हिडीओ रात्रीच्या वेळचा आहे. या प्रचाराच्या दरम्यान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भोवती लोकांचा गराडा आहे. त्यावेळी बोलताना नाना पटोले म्हणतात की, 'मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो.' नाना पटोलेंचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून यावर विविध पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत.
भंडारा गोंदियाचे भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनीही नाना पटोले यांच्या विरोधात भंडारा शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रार घेतली असून चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र आज सकाळपर्यंत नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर कोर्टात धाव घेऊ असे सुनील मेंढे यांनी सांगितले आहे.
पटोलेंच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते' असं म्हणत फडणवीस यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे, लोक माझ्या बाजूला गोळा झाले आहेत. सध्या आमच्या जिल्ह्यात निवडणुका सुरू आहे आणि त्या प्रचारादरम्यान लोकांनी माझ्याकडे गावातील मोदी नावाच्या गुंडाबद्दल तक्रार केली होती. त्यामुळे मी त्या गावगुंडाला बोलू शकतो, वेळ आली तर मारू सुद्धा शकतो, तुम्हाला काही घाबरण्याचे कारण नाही, असं आश्वासन त्यांना दिले होते. मी त्या गावगुंडाबद्दल बोललो होतो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललो नाही, असा खुलासा पटोले यांनी केला आहे.