(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मनोहर जोशी यांचं वकव्य वैयक्तिक, शिवसेनेची भूमिका नाही : नीलम गोऱ्हे
जेष्ठ पिढीच्या अशा भावना स्वाभाविक असल्या तरिही अशी शिवसेनेची कोणतीच भूमिका नाही. तसेच सध्याचे भाजपचा मार्ग व व्यवहार सहकारी मित्र पक्षांना संपवण्यासाठी असल्याने त्या मार्गाला स्विकारणे शिवसेनेला शक्य नाही, असं नीलम गोऱ्हे यांनी बोलताना सांगितले.
मुंबई : निवडणुकींचे निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं बदलेली पाहायला मिळाली. राज्यातील सत्तापेचानंतर महायुतीचं सरकार जाऊन शिवसेना आणि भाजपमध्ये फूट पडली आणि जुनी मैत्री तोडून शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी मैत्री केली. अनेक दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील सत्तेचा तिढा सुटला आणि महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आली. शिवसेनेन मुख्यमंत्रीपदासाठी भाजपशी फारकत घेतली होती आणि अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण आता या सर्व प्रकरणानंतर शिवसेना जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केलेल्या धक्कादायक विधानामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
पाहा व्हिडीओ : नेमकं काय म्हणाले मनोहर जोशी
भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवं हेच चांगलं आहे असं मला वाटतं. शिवसेना आणि भाजप कधीही एकत्र येतील, भाजपसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील, असं खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केलं आहे. मात्र सद्यस्थितीत दोन्ही पक्षांना ते मान्य नसल्याचं दिसतं आहे. असंही मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे.मनोहर जोशी यावेळी बोलताना म्हणाले की, छोट्या मोठ्या गोष्टीवरुन झगडा करण्यापेक्षा काही गोष्टी सहन कराव्या. काही गोष्टी आपल्या आग्रहाच्या असतील त्या सांगाव्यात. एकत्र काम केलं तर दोघांच्याही फायद्याचं ठरेल. ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही त्यावेळी मतं गोळा करण्याच्या निमित्ताने किंवा आपला पक्ष पसरवण्याच्या दृष्टीने अशा गोष्टी घडतात. तसं सध्या शिवसेना आणि भाजपच्या बाबतीत झालं आहे. याचा अर्थ आम्ही भाजपबरोबर कधीच जाणार नाहीत असं नाही. योग्य वेळ येताच उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील, असे मनोहर जोशी यावेळी म्हणाले.
Neelam Gorhe, Shiv Sena: Manohar Joshi ji has given a statement that Shiv Sena and BJP will come together soon, this is his personal statement and not Shiv Sena's official stand. This kind of feeling & emotions in a generation of leaders is obvious. #Maharashtra pic.twitter.com/K0FU2MCbEA
— ANI (@ANI) December 11, 2019
मात्र शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मनोहर जोशींच्या या वक्यव्याचं खंडन करत, ही मनोहर जोशी यांचं वैयक्तिक मत आहे, असल्याचं सांगितलं आहे. त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, या जेष्ठ पिढीच्या अशा भावना स्वाभाविक असल्या तरिही अशी शिवसेनेची कोणतीच भूमिका नाही. तसेच सध्याचे भाजपचा मार्ग व व्यवहार सहकारी मित्र पक्षांना संपवण्यासाठी असल्याने त्या मार्गाला स्विकारणे शिवसेनेला शक्य नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांची लोकशाही विकास आघाडी मजबुत असून ते जनतेशी प्रामाणिकपणे बांधीलकी ठेऊन काम करत असल्याचेही नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. निवडणुकीआधी महायुतीच्या बॅनरखाली भाजपा आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्र लढले होते. निकालानंतर कौलही महायुतीलाच मिळाला होता. त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. मात्र शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळालंच पाहिजे असा दावा केला होता.
संबंधित बातम्या :
शिवसेना आणि भाजप कधीही एकत्र येतील, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं खळबळजनक वक्तव्य
महत्त्वाच्या खात्यांवरून अडलं खातेवाटप, सरकार स्थापनेच्या 13 दिवसानंतरही तिढा कायम