NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट' पेपर फुटीप्रकरणातील आरोपी संजय जाधव हा सोलापुरातील माढ्याच्या प्राथमिक शाळेत गेल्या वर्षभरापासून उपशिक्षकाचं काम करत होता.
लातूर : देशातील शैक्षणिक क्षेत्रासह पालकांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या नीट (Neet) परीक्षांच्या घोळाचे धागेदोरे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यापर्यंत पोहोचले होते. मात्र, लातूर जिल्ह्यातील कनेक्शन उघड झाल्यानंतर आता सोलापूर आणि धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात नीट प्रकरणाचं कनेक्शन असल्याचं उघडकीस आलं आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील उपशिक्षक संजय जाधव यास अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने (Court) संजय जाधवला 6 दिवसांसाठी पोलिसांच्या (Police) कोठडीत पाठवलं आहे. दुसरीकडे अद्यापही दोन आरोपी फरार असून पोलिसांकडून दोघांचा शोध घेण्यात येत आहे.
वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट' पेपर फुटीप्रकरणातील आरोपी संजय जाधव हा सोलापुरातील माढ्याच्या प्राथमिक शाळेत गेल्या वर्षभरापासून उपशिक्षकाचं काम करत होता. जिल्हा परिषद शाळेत असणाऱ्या उपशिक्षकाचं नाव नीट परीक्षा कनेक्शनमध्ये आल्यानं माढा तालुक्याच्याच नव्हे तर सोलापूर जिल्ह्याच्या शिक्षण विभागातही खळबळ माजली आहे. त्यानंतर, आता याप्रकरणातील आणखी एक आरोपी धाराशिव जिल्ह्याच्या उमरग्यातील असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोन आरोपी अटक आहेत तर दोनजण फरार आहेत. पोलिसांकडून आरोपी इरान्ना कोंगलवार आणि गंगाधर याचा शोध सुरू आहे. यातील फरार आरोपी इरान्ना कोंगलवार हा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआयमध्ये नोकरी करतो. मात्र, तो मागील अनेक वर्षापासून लातूर शहरातील औसा रोड भागात राहत आहे. शनिवारपासून त्याच्या घराला कुलूप असून पत्नी आणि तीन मुलांना घेऊन तो बेपत्ता झाला आहे. त्यामुळे, पोलिसांकडून आरोपी इरान्ना कोंगलवारचा शोध घेत आहेत.
पोलीस पथक उत्तराखंडला रवाना
पोलीस आरोपी इरान्नाच्या मागावर असून फरार आरोपींना शोधण्यासाठी अनेक पथके रवाना करण्यात आली आहेत. लातूर पोलिसाचं एक पथक उत्तराखंड भागात रवाना झालं असून उत्तराखंड भागात पोलिसाचे पथक दाखल झाले आहे. गंगाधर आणि इरान्ना कोंगलवार हे फरार आहेत, त्यापैकी नेमकं कोणत्या आरोपीच्या मागावर लातूर पोलीस आहेत, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, उरग्यात जाऊन त्यांनी इरान्ना कोंगलवारच्या घरी धाड टाकल्यामुळे, पोलिसांच्या प्रथम टार्गेटवर इरान्ना असल्याचं दिसून येतं.
लातूरमधील मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण निलंबित
नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी जलीलखाँ पठाण यावर जिल्हा परिषदेनं निलंबनाची कारवाई केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी निलंबित केलं आहे. जलीलखा पठाण हा लातूर जिल्ह्यातील कातपर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक होता, असं निलंबन आदेशात म्हटलं आहे. आरोपी मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा जनमानसात मलिन झाली आहे. त्यांची जबाबदारी शैक्षणिक कामकाज असताना त्यांची सेवेविषयी बेपर्वाई आणि अनास्था दिसून आली आहे.