N. D. Patil : एनडींनी घोषणा दिली, टोलची खोकी पंचगंगेत बुडवू, जे देशात कुणालाही जमलं नाही ते एन डींनी करुन दाखवलं!
Kolhapur News : राज्याच्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालंय.
Kolhapur News : पुरोगामी महाराष्ट्रातील बुलंद आवाज प्रा. एन. डी. पाटील (N D Patil) यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. या लढवय्या नेत्याची झुंज 93 व्या वर्षी संपली. कोल्हापुरातील (Kolhapur) अॅपल सरस्वती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्रातील विवेकी आवाज, पुरोगामी चेहरा, संघर्ष योद्धा, रचनात्मक लढाईचे निर्माते, सीमा लढ्याचा नेता, सेझविरुद्ध लढ्याचा कॅप्टन, रयत शिक्षण संस्थेचा चारित्र्यसंपन्न चेहरा असं ऑल राऊंडर व्यक्तीमत्व म्हणजे एन डी पाटील होते. जिथे जिथे संघर्ष, तिथे तिथे एन डी पाटील हे नाव होतंच होतं. ज्या लढाईत एन डी पाटील उतरले, तिथे विजय पक्का असा विश्वास आंदोलनकर्त्यांना होता.
गेल्या चार-पाच दशकात महाराष्ट्रातील असंही एकही आंदोलन नव्हतं, जिथे एन डी पाटील सर उतरले नाहीत. चांद्यापासून बांद्यापर्यंत एन डी पाटील सरांनी रचनात्मक आंदोलनाची निर्मिती केली. सांगलीत जन्मलेल्या एन डी पाटलांची कार्यसीमा महाराष्ट्रात असली तरी कोल्हापुरात त्यांचा कार्यकाळ गेला. छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आदर्श ठेवून एन डी पाटलांचं कार्य चाललं.
कोल्हापूरचं टोल आंदोलन
कोल्हापूरमध्ये शहरांतर्गत 49 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले. आयआरबी कंपनीने या रस्त्यांचं काम केलं आहे. आयआरबी टोल उभारून रस्त्याचं पैसे वसूल करणार होती. मात्र शहरांतर्गत टोल आणि आयआरबीने केलेल्या रस्त्याचं दर्जाहीन काम याला कोल्हापूरकरांचा विरोध होता. राज्यात किंवा देशात शहरांतर्गत टोल हा फक्त कोल्हापुरातच का, असा सवाल करत, गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरात जनआंदोलन सुरु होतं. या आंदोलना जवळपास 5 वर्षांनी यश आलं. पालिकेने कोल्हापुरातील 49.49 किमीचे अंतर्गत रस्ते आयआरबी कंपनीच्या साह्याने उभारले. 2007 पासून या कामाला सुरुवात झाली. मात्र 220 कोटींचा हा प्रकल्प नंतर 520 कोटींच्या घरात गेला. 30 वर्षे टोल वसुलीला सरकारने परवानगी दिली होती. शहरांतर्गत रस्त्यावरही टोल वसुली करण्याचा पायलट प्रकल्प आयआरबी आणि सरकारच्या संगनमताने कोल्हापुरात सुरू करण्यात आला होता.
एन. डी. पाटलांनी आंदोलनाची वात पेटवली
संपूर्ण देशात गाजलेल्या कोल्हापूरच्या टोल आंदोलनाचं नेतृत्त्व लढवय्या एन डी पाटलांनी केलं. आयआरबी कंपनीने कोल्हापुरातील रस्ते बनवल्यानंतर, शहरांतर्गत प्रवासासाठी टोल हा नवा नियम कोल्हापुरात आला होता. त्याविरोधात कोल्हापूरकरांनी रणशिंग फुंकलं. या आंदोलनाला लोकचळवळीचं रुप आलं. एन डी पाटील, गोविंद पानसरे, निवास साळोखे यासारखे नेते या टोलविरोधात पेटून उठले. रस्त्यावरच्या लढाईपासून ते धोरणात्मक निर्णयापर्यंत एन डी पाटलांनी नेटाने लढा उभारला. जोपर्यंत टोलची खोकी पंचगंगा नदीत बुडवत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा निर्धार एन डी पाटील यांनी केला. व्हीलचेअरवर बसूनही ते आंदोलनाच्याअग्रभागी असत.
टोल हा झिजिया कर
टोल हा झीजिया कर आहे असं एन डी पाटील म्हणायचे. एनडींची भाषणं मर्मभेदी होती. या भाषणातील एक एक वाक्य हे प्रबंधासारखं होतं. जनतेच्या बरोबरीने शेवटच्या श्वासापर्यंत टोलचा लढा सुरू ठेवणार असा अंगार एन डी पाटलांनी पेटवला होता. महत्त्वाचं म्हणजे ज्या वाहनांना टोल लागणार होता, त्यांचा आंदोलनात तितकासा सहभाग नव्हता. मात्र सर्वसामान्यांना घेऊन एन डी सरांनी हे आंदोलन सुरु ठेवलं. चारचाकी मालकांचा प्रतिसाद नाही; तरीही रस्त्यावरील माणसाच्या जोरावर आंदोलन सुरू ठेवू, असा निर्धार त्यांनी केला होता.
एक पाय आणि एका किडनीवर आंदोलनास सज्ज
वयोमानानुसार एन डी पाटील यांचं शरीर थकलं होतं. त्यांना एक पाय आणि एका किडनीचा त्रास होता. मात्र कोणत्याही आंदोलनासाठी एन डी सर नेहमीच अग्रेसर असायचे. जिथे अन्याय, तिथे संघर्षाची त्यांची भूमिका होती. एन डी पाटील म्हणायचे, मी कोणत्याही आंदोलनासाठी एका पायावर आणि एका किडनीवर लढण्यासाठी सदैव तयार आहे. त्यांच्या या वाक्यांनी आंदोलकांना प्रेरणेचं बळ मिळायचं. आंदोलनाला यश मिळायचं.
एन डी पाटील यांच्या जाण्याने विवेकी महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा हरपल्याची भावना आज प्रत्येकाची आहे.
कोल्हापूरचा टोलविरोधी लढा नेमका कसा होता?
- जानेवारी 2009 - रस्ते विकास प्रकल्पाला सुरुवात
- 18 डिसेंबर 2011 रोजी टोलविरोधी कृती समितीची स्थापना
- 09 जानेवारी 2012 - टोलविरोधातला पहिला महामोर्चा
- 01 मे 2013 - टोलविरोधात कोल्हापूर बंद
- 17 ऑक्टोबर 2013 पासून पोलीस बंदोबस्तात टोलवसुलीला सुरुवात
- 20 ऑक्टोबर 2013 - सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या मंत्र्यांच्या घरावर मोर्चा
- 06 जानेवारी 2014 - कृती समितीचे बेमुदत उपोषण सुरु
- 12 जानेवारी 2014 - टोलनाक्यांची जाळपोळ
- 27 फेब्रुवारी 2014 - टोलवसुलीला उच्च न्यायालयाची स्थगिती
- 05 मे 2014 - सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती उठवली
- 16 जून 2014 - पोलीस बंदोबस्तात टोलवसुली सुरु
- 23 डिसेंबर 2015 - शहरामधील 9 टोल रद्द, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा
- रस्ते विकास प्रकल्प - 220 कोटी रुपयांचा
- प्रकल्पाचा करार - कोल्हापूर मनपा, राज्य सरकार, एमएसआरडीसी, आयआरबी
- 49 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार केला
- 9 टोलनाक्यांवरुन 30 वर्ष टोलवसुली होणार होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह