NCP Crisis : आम्हाला आमचं म्हणणं मांडण्याचा अधिकार, निवडणूक आयोगाच्या सुनावणीनंतर सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
Sunil Tatkare On Sharad Pawar : दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर गुणवत्तेवर, पक्षाच्या घटनेवर निवडणूक आयोग निर्णय घेईल असं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले.
मुंबई: निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची याबाबत आजपासून सुनावणी सुरू झाली. आजच्या घडलेल्या युक्तिवादावर सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाची भूमिका स्पष्ट केली. निवडणूक आयोगासमोर बाजू मांडण्याचा अधिकार जसा आम्हाला आहे तसा विरोधी गटालादेखील आहे, निवडणूक आयोगाचा निर्णय हा गुणवत्तेवर असेल अशी भूमिका अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी मांडली.
आम्हाला आमचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही घेतलेल्या भूमिकेवर युक्तिवाद करण्याचा त्यांनाही तितकाच अधिकार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर गुणवत्तेवर, पक्षाच्या घटनेवर निवडणूक आयोगाने निर्णय घ्यायचा आहे. आजची पहिली सुनावणी आहे. आता पुढे युक्तीवाद होत राहतील तसतशी भूमिका आमचे वकील आमच्यावतीने मांडतील अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.
आमच्या विधी तज्ज्ञांकडून युक्तीवादावर माहिती घेतली असता समोरील लोकांकडून काही आक्षेप घेतले गेले. ते आक्षेप निवडणूक आयोगाने रद्द केले आहेत आणि थेट मेरीटवर सुनावणी सुरू केली आहे. आमच्या वकिलांकडून युक्तिवाद झाले आहेत. उर्वरित युक्तिवादाची सुनावणी सोमवारी 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे असेही सुनील तटकरे म्हणाले.
सुनील तटकरे म्हणाले की, मृत व्यक्तींचे प्रतिज्ञापत्र दिले गेले आहेत असा आक्षेप नोंदवण्यात आला. मात्र यावेळी एकच प्रतिज्ञापत्र दाखवण्यात आले. आमच्या वकिलांनी जे प्रतिज्ञापत्र आहे त्यात मृत्यू दाखला आहे तो संबंधित व्यक्तीच्या वडिलांचा आहे. प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे ते मृत व्यक्तीचे नसून तो दाखला त्याच्या वडिलांचा आहे हे आमच्या वकिलांनी सांगितले आहे. हा युक्तिवाद अजून पूर्ण झाला नाही. हे सगळे युक्तिवादात समोर येईलच.
समोरच्या लोकांचे आक्षेप ऐकले गेले म्हणून तर निवडणूक आयोगाने त्यांचे आक्षेप रद्द केले आहेत. त्यामुळे मेरीटवर युक्तिवादाला सुरुवात झाली आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
प्रत्येकाला आपापली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. युक्तीवाद करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु निवडणूक आयोग स्वायत्त आहे त्यामुळे जो काही निर्णय असेल तो निवडून आयोग युक्तिवाद ऐकल्यानंतर घेईल. आतल्या सुनावणीची अधिकृत माहिती आमचे वकील दिल्लीत देतीलच असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाकडे शपथपत्र दाखल झाली आहेत त्याची स्पष्टता निवडणूक आयोग पुढच्या कालावधीत करेलच, त्यामुळे अजून थोडे दिवस वाट पहावी लागेल असेही सुनिल तटकरे म्हणाले.
आमचे स्पष्ट म्हणणे 30 जून रोजी याचिकेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे दाखल केले आहे. निवडणूक आयोग गुणवत्तेवर ठरवेल असे पुन्हा एकदा सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ठामपणे सांगितले.
ही बातमी वाचा: