Sharad Pawar : प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी जबाबदारी पार पाडली नाही, त्यांच्यावर कारवाई करणार; शरद पवारांचा इशारा
Sharad Pawar On Ajit Pawar : अजित पवारांच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: अजित पवारांच्या शपवविधीला उपस्थिती राहणं आता राष्ट्रवादीचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना भोवणार असल्याचं दिसतंय. प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती मी केलीय, त्यांनी त्यांना दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही असं सांगत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar On Ajit Pawar) सांगितलं. तसेच सुनिल तटकरे यांनीही त्यांची जबाबदारी पार पाडली नाही, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, यापुढे पक्ष वाढवण्यासाठी दौरे करणार असंही ते म्हणाले.
अजित पवारांनी आज शिंदे-भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून आज त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 37 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. अजित पवारांच्या आजच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुनिल तटकरे हे उपस्थित होते. या सर्व घडामोडींवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. पक्ष योग्य पद्धतीने चालावा यासाठी मी प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. पण प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
गेलेल्यांच्या राजकीय भविष्याची मला चिंता
राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवारांसोबत गेले असून त्यांतल्या आठ जणांनी शपथ घेतली. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, एकेकाळी माझ्यासोबत 56 आमदार होते. त्यापैकी 50 जण मला सोडून गेले. एका क्षणात मी फक्त सहा आमदारांचा नेता झालो. त्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचलो, माझी भमिका मांडली. त्यानंतरच्या निवडणुकीत सोडून गेलेल्या 50 पैकी चार ते पाच जणच निवडून आले, बाकी सगळे पडले. आताही मला सोडून गेलेल्यांची मला चिंता नाही. जे सोडून गेलेत त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे.
ही बातमी वाचा: