राजकीय हेतु ठेवून अर्धवट कामाचे उद्घाटन; रोहित पवारांची टीका
Rohit Pawar : राजकिय हेतु ठेवून अर्धवट कामाचे उद्घाटन केले आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
Rohit Pawar on PM Narendra Modi Pune Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात मोदी यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर राज्यातील नेत्यांनी टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही टीका केली. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही मोदींच्या पुणे दौऱ्यावर निशाणा साधला आहे. राजकिय हेतु ठेवून अर्धवट कामाचे उद्घाटन केले आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणूका नजरेसमोर ठेवून स्थानिक भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात मेट्रोच्या अर्धवट कामाचे उद्घाटन केल्याचे आमदार रोहित पवारांनी म्हटले आहे. जामखेड येथे लघु उद्योगांच्या मशिनरींचे प्रदर्शन आणि 151 बचत गटांना कर्ज वितरण कार्यक्रमानंतर रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करतो मात्र, राजकीय हेतू ठेवून अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर टीका केली होती. अर्धवट काम झालेल्या मेट्रोचे उद्घाटन करण्यापेक्षा युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडून आणण गरजेचं आहे असं शरद पवार यांनी म्हटले होते. तर खऱ्या अर्थाने काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता असतानाच मेट्रोच्या कामाला मंजुरी मिळाली होती असं रोहित पवार यांनी म्हटले आहे.
नारायण राणेंवर साधला निशाणा -
आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी नको ते विषय समोर करून राज्याची बदनामी करण्याचं काम भाजपचे काही नेते करत असल्याचे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण यांच्यावर नाव न घेता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. सुशांतसिंह राजपूत आणि दिशाच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोन वेळा फोन केला आणि मंत्र्याची गाडी होती हे बोलू नका असं सांगितल्याचा दावा नारायण राणेंनी केला होता. याबाबत आमदार रोहित पवार यांना विचारले असता केवळ आपली राजकिय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न काही नेते करतात या प्रकरणाबाबत अनेक आरोप- प्रत्यारोप करण्यात आले, सीबीआय चौकशी झाली होती पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही, असं आमदार पवार म्हणाले.