Bharat Bhalke Death LIVE Updates | आमदार भारत भालके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं निधन झालं. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
LIVE
Background
पुणे/पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं निधन झालं. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके हे 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पुत्र भगीरथ, तीन विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे.
भारत भालके यांना कोविड-19 झाला होता. त्यातून ते बरेही झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे दाखल करण्यात आलं होतं. मात्र न्युमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती ढासळत गेली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (27 नोव्हेंबर) हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती. रात्री साडे बारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं.
पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावातील शेतात आमदार भारत भालके यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. पुण्याहून सकाळी सात वाजता पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावाकडे पुण्याहून निघेल. सकाळी अकरापर्यंत गावी पोहोचेल. यानंतर चार वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव घरासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवला जाईल. दुपारी चार वाजता याच ठिकाणी त्यांच्या शेतात भालके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
कायम लोकांमध्ये राहणारा अतिशय रांगडा नेता अशी भारत भालके यांची ओळख होती. डोक्यावर परिट घडीची पांढरी टोपी, पांढरा तीन गुंड्यांचा पैलवान शर्ट आणि विजार असा साधा पोशाख तसंच कायम दाढीत असणारे नाना यांची ग्रामीण बाजाची भाषा जनतेत खूप लोकप्रिय होती. बेधडक बोलणारा आमदार असा त्यांची ओळख असल्याने अधिकारी वर्गातही त्यांच्याविषयी भीतीयुक्त आदर होता.
2009, 2014 आणि 2019 असे सलग तीन वेळा भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक केली होती. पंढरपूर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणातील मोठं प्रस्थ असलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांना पराभूत करणारे जायंट किलर होते भारत भालके.
2019 विधानसभा निवडणुकी आधी काँग्रेसचे आमदार होते. भाजपकडून तिकीट मिळवण्यास ते इच्छूक होते. परंतु भाजपने तिकीट दिलं नाही म्हणून राष्ट्रवादीकडे तिकीट मागितलं. काँग्रेसने जागा राष्ट्रवादीला सोडली आणि भारत भालके राष्ट्रवादीकडून आमदार झाले.
भारत भालके यांचा अल्पपरिचय
- आमदार भारत तुकाराम भालके (वय 60 वर्ष), निवास - सरकोली, ता. पंढरपूर
- कुस्तीची आवड असल्याने कोल्हापूरमध्ये तालमीचे धडे गिरवले, कुस्त्यांचे अनेक फड जिंकले.
- तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून राजकीय वाटचालीस सुरुवात. नंतर स्वकर्तृत्वावर याच कारखानीचे उपाध्यक्ष आणि नंतर गेली अनेक वर्षे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
- 2004 साली पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला
- यानंतर 2009 मध्ये मतदारसंघाची फेररचना झाल्यावर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात रिडालोसकडून निवडणूक लढवत, थेट उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले .
- 2014 साली पुन्हा काँग्रेसकडून निवडणूक लढवत प्रशांत परिचारक यांचा पराभव केला .
- 2019 मध्ये काँग्रेसला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश, ज्येष्ठ माजी आमदार दिवंगत सुधाकर परिचारक यांचा पराभव करत विजयाची हॅटट्रिक केली.