'कन्यादान'वरुन आमनेसामने! मला माफी मागण्यास सांगणाऱ्यांनी आधी...; मिटकरींचं स्पष्टीकरण
Amol Mitkari : कोणत्याही समाजाबद्दल अपशब्द वापरले नाहीत, असं म्हणत अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे.
Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सांगलीतल्या सभेत कन्यादानाबद्दल वक्तव्य केलं आणि याच वक्तव्याविरोधात राज्यभरात ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे. गुरुवारी पुण्यात तर ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यासर्व प्रकारानंतर अमोल मिटकरी यांनी यासर्व प्रकारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही समाजाबद्दल अपशब्द वापरले नाहीत, असं म्हणत अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल मिटकरी बोलताना म्हणाले की, "मी बोलताना एक प्रसंग सांगितला. कन्यादान करत असताना जो मंत्र ऐकला होता, त्या मंत्राचा स्पष्टीकरण केल्यानंतर भाजप प्रणित काही संघटना यांचा विपर्यास करून माफी मागा, माफी मागा असं सातत्यानं सांगत आहेत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी करत आहेत." पुढे बोलताना ते म्हणाले की, "माझ्या पक्षाची अशी शिकवण नाही, तसेच शिव, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठेंनी अशी कुणा धर्माविरुद्ध बोलावं अशी शिकवण दिलेली नाही."
"मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि जी लोक आज मला माफी मागा असं म्हणत आहेत, त्यांना माझा विनम्रतेने आवाहन आहे. राजमाता जिजाऊंच्या बाबतीत राजा शिवछत्रपती कादंबरीमध्ये ज्या बदनाम्या झाल्या आणि त्यांचं परत पुरस्कार करणारे वातावरण अगदी काही महाराष्ट्राच्या वातावरणात सुरू आहे. त्या पुरंदरे यांनी लिहिलेल्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या अपमानकारक मजकुराची माफी मागावी.", असं मिटकरी म्हणाले. तसेच पुढे बोलताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्यव्य केलं, त्यांनी तर त्याची माफी मागितली नाही, असं म्हणाले. तसेच, मी कुणाच्या जातीविरुद्ध धर्माविरुद्ध बोललो नाही, भाजप प्रणित संघटनांनी यामध्ये फक्त राजकारण चालविलं आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीकाही केली.
मिटकरींच्या कोणत्या वक्तव्यावरुन वादाला तोंड
सांगलीतल्या सभेत बोलताना अमोल मिटकरींनी एक किस्सा सांगितला होता. "एका ठिकाणी मी गेलो. कन्यादान सुरु होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात, तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं आरे येड्या, ते महाराज म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा. आरारारा… कधी सुधरणार?", असं मिटकरी म्हणाले होते.
दरम्यान, या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना अमोल मिटकरी यांनी माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :