(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महागाईपासून लपण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्यातील विरोधी पक्षाकडून आरोप-प्रत्यारोप : सुप्रिया सुळे
महागाईपासून लपण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्यातील विरोधी पक्षाकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.
Supriya Sule : महागाईसह परदेशातून परतलेल्या विद्यार्थ्यांचं पुढं काय होणार? असे अनेक प्रश्न आज देशासमोर आहेत. परंतु, थातूरमातूर आरोप आणि पेनड्राईव्हसारखी प्रकरणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी आहेत. देश कसा पुढे जाईल आणि जनतेला महागाईतून कसा दिलासा मिळेल हे बघणं महत्वाचं आहे. परंतु, हे सर्व सोडून सातत्याने केंद्र सरकार आणि राज्यातील विरोधी पक्ष आरोप-प्रत्यारोप करत आहेत. महागाईपासून लपण्यासाठी हे आरोप केले जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी याबाबत सर्वपक्षीय खासदारांचा बारामती दौरा नुकताच झाला. यावेळी बारामती एमआयडीसी, विविध संस्था, टेक्सटाईल पार्क अशा विविध संस्थांना भेटी देवून त्यांनी माहिती घेतली. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "राज्यातील केंद्रीय तपास यंत्रणांच्या अतिरेकाबाबत मी गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी मला संसदेत उत्तरही दिलेलं आहे. नियम आणि कायदे बनवताना कोणीही कायम सत्तेत नसतो, याचा विचार केला गेला पाहिजे. असाही कोणी निर्णय घेवू नये की त्याचा गैरवापर होईल. आपल्या विरोधकांना त्रास देण्याच्या हेतूने त्याचा वापर होवू नये, असा प्रयत्न सर्वांनीच केला पाहिजे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "या देशातलं राजकारण बदलल्याचं अजित पवार म्हणतात. अगदी तशीच आज परिस्थिती आहे. सूडाचं राजकारण हे या देशात कधीच नव्हतं. परंतु, सध्या हे सातत्यानं पहायला मिळत आहे. देशासमोर महत्वाचे प्रश्न आहेत. आज देशात महागाई, रोजगार असे गंभीर विषय आहेत. कोरोनातून आपण आता बाहेर पडत आहोत. त्यामुळे राजकारण्यांनी देश कसा पुढे जाईल? याकडे लक्ष दिले पाहिजे. राजकारण होतच राहील, निवडणुका आल्यानंतर लढू. परंतु, आता या देशाला अर्थव्यवस्था रुळावर आणण्याची गरज आहे. याबरोबरच लोकांच्या हाताला काम देण्याची आणि कोरोनामुळे व जगातील परिस्थितीमुळे देशात निर्माण झालेल्या संकटावर मात करण्याची आवश्यकता आहे. त्यावर लक्ष देणं आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या