महागाईविरोधात 31 मार्चपासून काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन ; नाना पटोलेंची माहिती
महागाईविरोधात 31 मार्चपासून काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.
Nana Patole : सर्वसामान्यांना त्रस्त करणाऱ्या महागाईविरोधात आवाज बुलंद करत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला जागे करण्यासाठी 31 मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी याबाबत माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेला माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसिम खान, माजी मंत्री अनिस अहमद, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष एम एम शेख उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले, ‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीसारखा भाजपाचा कारभार आहे. निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामारे जायला नको म्हणून इंधन दरवाढ रोखून धरली. परंतु, निवडणुका संपल्यानंतर लगेचच जनतेवर महागाईचा भार टाकण्यास सुरुवात केली आहे. मागील पाच दिवसात पेट्रोल आणि डिझेल 3.20 रुपये प्रति लिटर महाग झाले आहे. तर एलपीजी गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. सीएनजी, पीएनजी गॅस तसेच खाद्यतेलाचे दरही वाढले असून 1 एप्रिलपासून औषधांचे दरही वाढणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जनतेला महागाईच्या खाईत लोटत असून त्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही."
"मोदी सरकारच्या या निर्णयाचे चटके देशातील जनता भोगत असून केंद्र सरकारला जागे करण्यासाठी 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सर्व काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करतील. तर 2 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान सर्व जिल्हा मुख्यालयात महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चा आयोजित केला आहे. तर 7 एप्रिल रोजी राज्य मुख्यालयात मुंबईत महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चाचे आयोजन केले आहे. या आंदोलनात काँग्रसेचे सर्व मंत्री, नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील" अशी माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली.
"संघटीत व असंघटीत कामगारांच्या समस्या आणि मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात डाव्या पक्षांच्या कामगार संघटनांनी 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संप पुरकारला आहे. या संपाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Imtiyaz Jaleel : मला खासदार करण्यासाठी अब्दुल सत्तारांचा सिंहाचा वाटा; जलील यांचा गौप्यस्फोट
- मला उद्धव ठाकरेंची कुंडली पाहायची आहे, काय भाग्यवान माणूस! : चंद्रकांत पाटील
- Charging Station : चांद्यापासून बांद्यापर्यंत पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार : अजित पवार